भारतीय संस्कृतीत होळी सणाला खूप महत्त्व आहे. जीवनाचे रंग दाखवणारा हा सण देशभरातील विविध परंपरा आणि संस्कृतींचा संगम मानला जातो. महाराष्ट्रात होळी हा सण ‘शिमगा उत्सव’ या नावाने प्रसिद्ध आहे. विशेषत: कोकण किनारपट्टी भागात या उत्सवाची रंगत 15 दिवस सुरू असते.
कोकणात खूप महत्त्व
फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशीची धुळवड संपूर्ण देशात जवळपास सारखीच असते. परंतु, महाराष्ट्रात शिमगा नावाने लोकप्रिय असलेला होळीचा हा उत्सव राज्यातील कोकण भागात सुमारे 15 दिवस सुरू असतो. कोकणात होळीचा उत्सव महत्त्वाचा मानला जातो. फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात हा सण सुमारे १५ दिवस साजरा केला जातो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम’ असे म्हणतात.
उत्सवात साजरा केला जातो शिमगा
कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी होडीवर जायचा मान घरातील स्त्रियांना दिला जातो. या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कोळी बांधव होडीवर जातात. पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सव यावेळी साजरा केला जातो.
अनेक लोककला होतात सादर
आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगा उत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात ‘जती’च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो. धुलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजच्या काळातही सुरू आहे. शिमगा उत्सवात नृत्याचे सादरीकरण हमखास केले जाते. वेगवेगळी सोंगे धारण करून कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळींनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यांसारखी सोंगे, असे विविध प्रकार यादरम्यान सादर केले जातात. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथ असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर केली जातात.
( हेही वाचा ‘अशी’ दिली जातेय विद्यार्थ्यांना उत्तम आहाराची शिकवण! )
बाराव्या शतकापासून परंपरा सुरु
राज्यातील आदिवासी जमातीतील स्त्री-पुरुष हा दिवस गुलाल उधळून, टिमक्या-ढोल वाजवून, नृत्य करून उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकांत होळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. होळी साजरी करत असताना, आदिवासी लोकांच्या भोजनामध्ये गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असतो. सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात. बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचे दिसते. दागदागिने घालून, नक्षीकाम करून स्त्री-पुरुष यात सहभागी होतात. विविध वाद्यांच्या तालावर नृत्य करतात.
Join Our WhatsApp Community