कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे देशभरातील लोक घरात बंदिस्त होते. त्या वेळेचा सदुपयोग करत शिवाजी राठोड यांनी पशू-पक्ष्यांची शिल्पे बनवली आहेत. सिमेंट, चुन्याचा वापर करत शिवाजी राठोड यांनी ५० पुतळे घडवले आहेत. हे पुतळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या बागेत लावण्यात आले आहेत. हे देखणी शिल्पे बागेत येणाऱ्या नागरिकांसह कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच यामुळे बागेचे सौंदर्य फुलले आहे.
( हेही वाचा : वाघ जगला नाही, तर… )
पशू-पक्ष्यांची ५० शिल्पे
शिवाजी राठोड हे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील कनिष्ठ सहाय्यक असून ते मूळचे फताटेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यावर शहरात राहण्याऐवजी ते कुटुंबासह गावी राहण्यासाठी गेले. शिल्पकलेची त्यांना आवड आहे. वाळू, सिमेंट वापरून त्यांनी शेतामध्ये गायीचे शिल्प तयार केले. कुटुंबीयांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे राठोड यांनी इंटरनेटवरून वन्यप्राणी, पक्ष्यांचे छायाचित्र शोधून वेगवेगळ्या शिल्पकृती साकारल्या. ही शिल्प पाहिल्यावर जिल्हा परिषदेसमोरील बागेतील मोकळ्या जागेत ठेवण्याची संकल्पना कर्मचारी युनियनचे विवेक लिंगराज यांनी मांडली. प्रशासनाने त्यास त्वरित होकार दिला. यामुळे या बागेचे सौंदर्य फुलून गेले. वन्यजीव दिनाचे औचित्य साधत वन्यप्राणी व पक्ष्यांचे ५० शिल्पे या बागेत ठेवण्यात आली आहेत.
Join Our WhatsApp Community