शिवाजी विद्यालय : १९७४ सालच्या स्मृतीना उजाळा

शाळा म्हटलं की, सगळ्या जुन्या आठवणींना एकदम उजाळा येतो व त्या एका चित्राप्रमाणे डोळ्यांसमोर उभ्या राहतात. आज शालेय शिक्षण पूर्ण होऊन जवळ जवळ ४६ वर्षांचा कालावधी उलटून गेला. तरी आठवणी मात्र अगदी ताज्या वाटतात. शिवाजी शिक्षणोत्तेजक मंडळाच्या शिवाजी विद्यालय, काळाचौकी, मुंबई १९७४ सालच्या अकरावी बॅचचा स्नेहसंमेलन सोहळा, शनिवार, तारीख २५ डिसेंबर २०२१ रोजी शाळेत सकाळी १० ते दुपारी ३ ह्या वेळात संपन्न झाला.

माजी शिक्षकांना आणि मित्रांना वाहिली श्रद्धांजली

संमेलनासाठी शाळेच्या नियोजित वर्गात येताच मित्रांचे गुलाबपुष्प, फळांचा रस व अल्पोपहाराने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला, सूत्रसंचालक सुनिल जाधव ह्यांनी शाळेचे संस्थापक नामदेव लोकेगांवकर आणि सुनंदा ना. लोकेगावकर ह्यांचे स्मरण करुन आभार मानले व शाळेतील दिवंगत माजी शिक्षकांना आणि मित्रांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.

शिक्षकांना विद्यार्थांचा अभिमान

४६ वर्षात रंगरुपात फरक पडलेल्या प्रत्येक मित्राने स्वत:ची कौटुंबीक माहिती सर्वांना थोडक्यात करून दिली. “शाळेतील खेळाचे सामने असो वा इतर सांस्कृतिक कार्यक्रम, त्यातील मजा व आनंद काही वेगळाच असायचा. शाळेत मुख्याध्यापकांचा एक वेगळाच धाक व शिस्त असायची. विद्यार्थी त्यांना शाळेबाहेरही तेवढेच घाबरत होते. तसे आपले सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागत. जर मस्ती केली व अभ्यास केला नाही तर शिक्षाही करत असत. ते त्यांचं काम एक जबाबदारी समजून करत होते. कारण याच त्यांच्या शिस्त व कर्तव्यातून त्यांना उद्याचा एक चांगला नागरिक घडवायचा होता. सगळेच शिक्षक तत्परतेने व जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक ल‍क्ष पुरवत असत. आपल्या बॅचच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल प्रचंड आदर, मान-सन्मान होता आणि तो आजही तसाच आहे. त्यांना आमची प्रगती कळल्यावर ते आवर्जून म्हणत ‘आम्ही शिकविले व तुम्ही शिकलात, म्हणून तुम्ही एवढे मोठे झालात.’ त्यांनाही आपल्या विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी आणि अभिमान वाटे”, असे शिवाजी चव्हाण बोलत होते आणि सगळे मित्र शांतचित्ताने ऐकत होतो.

( हेही वाचा :मोहम्मद शमीचा विक्रम, किती घेतले बळी?)

शाळेत आलेले सर्वच संवगडी बनले

एकामागे एक सगळेच आपले अनुभव, आपल्या आठवणी सांगत होते. त्याच जोडीने शिक्षकांच्या आठवणी, गाणी, नाटकातील ऊतारे, कविता सादर करुन काही मित्रांनी, ऊर्वरीत मित्रांचे मनोरंजनही केले. सगळेच वेगवेगळया क्षेत्रात काम करताना शासकीय, निम शासकीय, खाजगी आस्थापनांमधून मोठमोठया हुद्द्यांवर काम करून आज सेवानिवृत्त झालेले आहेत. पण शाळेत आल्यानंतर सारेच सवंगडी शाळकरी झाले होते. निघताना मात्र चेहऱ्यावर हासू आणि डोळयांतून आसू असा संगम झालेला दिसत होता. महादेव राणे आणि कमलाकर पांचाळ ह्या मित्रांनी अतिशय नेटकेपणे आयोजन केलेल्या ह्या समारंभाची सांगता अतिशय रुचकर अशा स्नेहभोजनाने आणि कार्यक्रम शाळेत साजरा करण्यासाठी परवानगी देणार्‍या राजेंद्र ना. लोकेगांवकर ह्यांचे आभार मानून झाली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here