फिट राहण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे असं नेहमीच सांगण्यात येतं आणि योगामध्येही सूर्यनमस्काराला अनन्य साधारण महत्त्व आहे. सूर्यनमस्काराप्रमाणेच शारीरिक आरोग्यासाठी चंद्र नमस्कारही उत्तम ठरतात. तुम्हाला चंद्र नमस्काराबाबत माहिती आहे का? जर तुम्ही याबाबत पहिल्यांदाच वाचत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे.
विशेषतः महिलांना चंद्र नमस्काराचा अधिक फायदा मिळतो. सूर्यनमस्कार हे सकाळी करण्यात येतात तर चंद्र नमस्कार नावाप्रमाणेच चंद्राच्या उदयानंतर अर्थात संध्याकाळी करण्यात येतात. दिवसभराचे काम, थकवा दूर करण्यासाठी तुम्ही चंद्र नमस्काराचा आधार घेऊन शारीरिक आणि मानसिक स्वरूपात स्वतःला फिट ठेऊ शकता. याबाबत योगा टीचर, फिलांथ्रोपिस्ट, धार्मिक गुरू आणि लाइफस्टाइल कोच ग्रँड मास्टर अक्षर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. दरम्यान चंद्र नमस्कार करताना आपले पोट रिकामे असेल याची खात्री करा, खाल्ल्यानंतर कोणतेही आसन करू नये.
चंद्र नमस्कार म्हणजे काय?
चंद्र नमस्कार अर्थात चंद्राला नमस्कार. चंद्र हा आपल्या भावनिक, भावनात्मक बुद्धिमत्ता आणि स्वादाचे प्रतिनिधीत्व करतो असं सांगण्यात येते. चंद्राची ऊर्जा आणि प्रवाहाचे माध्यम हे प्रतिकात्मक रूप असून डाव्या बाजूचे प्रतिनिधीत्व करतो असंही योगामध्ये सांगण्यात येते. रोज चंद्र नमस्कार घालण्याचे अनेक फायदे मिळतात.
चंद्र नमस्काराचे शारीरिक लाभ
शारीरिक रूपाने चंद्र नमस्कार केल्याने पाठीचा मागचा भाग अधिक मजबूत होण्यास मदत मिळते आणि खांद्याचा त्रास होत असेल तरीही यामुळे लाभ होतो. गुडघ्यातून येत असणाऱ्या क्रॅम्प्सना ल्युब्रिकेट करून गुडघ्याचा त्रास कमी करण्यसाठीही याचा उपयोग होतो. तसंच नियमित चंद्र नमस्काराचा सराव केल्यामुळे पेल्विक एरिया अधिक लवचिक होतो. वजन कमी करण्यसाठीही तुम्ही या योगाचा सराव करू शकता.
भावनात्मक लाभ
चंद्र हा आपल्या भावनेशी संबंधित मानला जातो. अगदी चंद्र रास कोणती आहे यावर तुमची भावनिक गुंतवणूक कशी असेल हे ज्योतिषशास्त्रात पाहिले जाते. चंद्रनमस्कारदेखील अनेक भावनात्मक लाभ प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरतो. सध्या तरूण पिढीमध्ये नैराश्य अधिक प्रमाणात वाढताना दिसते. जर मनःशांती हवी असेल आणि नैराश्यापासून सुटका हवी असेल तर नियमित चंद्र नमस्कार योगाचा तुम्ही अभ्यास करावा. आपल्या भावनिक संतुलनासाठी याचा अधिक फायदा होतो.
(हेही वाचा Chandrayaan – 3 : प्रकाश राज यांना चंद्रयान मोहिमेची खिल्ली उडवणे भोवले; पोलिसांत तक्रार दाखल)
अध्यात्मिक लाभ
आपल्या इंद्रियांवर, भावनांवर, मनावर आणि आपल्या पालनपोषणावरही चंद्र नमस्काराचा चांगला परिणाम होताना दिसतो. सकारात्मक विकास वाढविण्यापासून ते नकारात्मक उर्जा शरीराबाहेर काढून टाकण्यासपर्यंत आध्यात्मिक लाभ चंद्र नमस्कारामुळे मिळतात. रोज संध्याकाळी रिकाम्या पोटी तुम्ही योग्य मार्गदर्शन घेत चंद्र नमस्कार घातल्याने काही दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल.
चंद्र नमस्काराची योग्य वेळ
चंद्र नाडी ही आपल्या डाव्या बाजूने चालते. त्यामुळे चंद्रनमस्कार सुरू करताना नेहमी डाव्या पायाने सुरू करावा. चंद्र नमस्कार घालण्याची योग्य वेळ संध्याकाळी ६ वाजता असून चंद्र उगवण्याच्या दिशेला तोंड करूनच मून योगा करावा. विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्राच्या प्रकाशात रात्री चंद्र नमस्कार घालणे हे शरीर आणि आत्म्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते.
कसा करावा चंद्र नमस्कार
- सखासन, अर्धपद्मासन अशा आरामदायी स्थितीत बसा आणि पाठ सरळ ठेऊन डोळे बंद करा
- सामान्य स्थितीत श्वास घ्या आणि सोडा, त्यानंतर हात छातीसमोर आणा आणि नमस्कार करा
- हा नमस्कार केल्यानंतर ३ श्लोकांचा उच्चार करावा. ओम ॐ गुरूभ्यो नमः, ॐ गुरूमंडलाय नमः आणि ॐ महाहिमालय नमः
- सिद्ध मुद्रा करून आपला उजवा हात डाव्या हातावर ठेवा आणि मुद्रा नाभीसमोर ठेवा
- त्यानंतर ॐ सिद्धोहम, ॐ संघो हम, ॐ आनंदो हम असे श्लोक म्हणा
- त्यानंतर हात गुडघ्यावर ठेवा आणि हळूहळू डोकं आणि हनुवटी छातीवर टेकवा
- डोळे उघडून पुढे पाहा आणि मग सामान्य स्थितीत येऊन श्वास घ्या आणि सोडा