सिंधुदुर्गची वारी का बनली जगात भारी?

155

कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातल्या ३० सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह सिंधुदुर्गचा समावेश आहे. या यादीत इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय तसेच भारतातल्या सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भिमताल, केरळमधील आयमानम या ९ पर्यटन स्थळांचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या एकमेव सिंधुदुर्गचा समावेश करण्यात आला आहे. जगातल्या सर्वात सुंदर ३० पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये सिंधुदुर्गचा समावेश असणं ही खरोखरच आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.

महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा

कोंड नेस्ट ट्रॅव्हलर, इंडिया हे एक मॅगझिन तसेच वेबसाईट असून दरवर्षी जगातील सुंदर पर्यटन स्थळांची यादी ते प्रसिद्ध करतात. त्यामध्ये या पर्यटन स्थळांची संपूर्ण माहिती दिली जाते. जागतिक स्तरावरील पर्यटनास चालना देण्यासाठी त्यांच्याकडून हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. यंदाच्यावर्षी भेट देण्यासाठी निवडण्यात आलेल्या ३० पर्यटन स्थळांमध्ये भारतातील ९ स्थळांचा समावेश आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा आहे. या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड होणे म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा जिल्हा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. यामध्ये स्वच्छ सुंदर किनारे, समुद्रातील प्रवाळ, सिंधुदुर्ग किल्ला, त्सुनामी आयलंड या सारख्या पर्यटनस्थळांविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन सोपे झाल्याने जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सिंधुदुर्ग पोहचला आहे.

( हेही वाचा : सिंधुदुर्गच्या जल पर्यटनात नवा अध्याय! )

या यादीमध्ये श्रीलंका, भूतान, कतार, जपान, युएई, इजिप्त, ओक्लाहोमा, सेऊल, गोबन, उझबेकिस्तान यासारख्या पर्यटनस्थळांचा समावेश आहे. आता या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनस्थळांच्या यादीत सिंधुदुर्गचा समावेश झाला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.