MTDC कडून पर्यटकांना विशेष सुविधा

100

मे महिन्याच्या सुट्ट्यांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) विशेष नियोजन करीत असून एमटीडीसीकडून पर्यटकांना अनुभवात्मक उपक्रमांबरोबरच विविध सोयी- सवलती देण्यात येणार आहेत.

कोविड नंतर एमटीडीसीच्या सर्वच पर्यटक निवासे/ रिसॉर्टमध्ये पर्यटकांचा ओघ वाढला आहे. यासाठी महामंडळाने नवनव्या संकल्पना राबविण्याची तयारी केली आहे. पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. जेष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती देण्यात येत आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी-माजी सैनिक आणि दिव्यांगासाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगसाठी 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहेत. तसेच शालेय सहलींसाठीही विशेष सवलती आहेत. पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ‘कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट’चीही सुरूवातही एमटीडीसीने केली असल्याने पर्यटक आनंद व्यक्त करीत आहेत.

( हेही वाचा : कंत्राटी भरतीविरोधात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आक्रमक )

पर्यटकांना संकेतस्थळावर माहिती उपलब्ध 

एमटीडीसीकडून पर्यटकांना पर्यटनविषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहिती, आसपासच्या निसर्गाची माहिती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहिती संकेतस्थळावर, फेसबुक आणि Whatsapp ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

नाशिक विभागातील ग्रेप पार्क, भंडारदरा, पुणे विभागातील महाबळेश्वर, लोणावळा (कार्ला), माळशेज घाट, माथेरान, कोकणातील तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे ही ठिकाणे पर्यटकांची मुख्य आकर्षणे ठरत आहेत. नाशिक, लोणावळा (कार्ला), गणपतीपुळे आणि तारकर्ली येथे महामंडळाची जल पर्यटन केंद्रे असून या ठिकाणी पर्यटक गर्दी करीत आहेत. रमणीय समुद्रकिनारे आणि थंड हवेची ठिकाणे देखील पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत.

ऑनलाईन बुकिंग सुरू

या हंगामामध्ये पर्यटकांसाठी अनुभवात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिक यांना प्रोत्साहन मिळेल. योगा आणि वेलनेसची शिबिरे घेण्याचेही प्रस्तावित असून स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध छंद, पारंपरिक खेळ, इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे.

ऐतिहासिक ठिकाणे, निसर्गरम्य समुद्रकिनारे, डोंगर रांगा आणि थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक निवासांमध्ये डेस्टिनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शूट, रिसेप्शन ही पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत असून याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आगामी काळात डेस्टिनेशन वेडींग, प्री-वेडींग फोटो शूट, रिसेप्शन फोटोशूट, कार्पोरेट कंपन्यांच्या बैठका आणि ‘वर्क फ्रॉम नेचर’ यांना एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये खास सवलत देण्यात येत असल्याने पर्यटकांमध्ये उत्साही वातावरण आहे. एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे आरक्षण सुरू असून www.mtdc.co या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात आले असल्याची माहिती एमटीडीसीचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.