अवतरण अकादमीतर्फे राज्यस्तरीय मराठी एकांकिका लेखन स्पर्धेचे आयोजन

‘अवतरण अकादमी’ ही नोंदणीकृत संस्था मुंबईत गेली २४ वर्षे, २७ मार्च हा युनेस्को संस्थापित ‘इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्युट’ घोषित “जागतिक रंगभूमी दिवस” साजरा करीत आहे. त्यानिमित्त प्रतिवर्षानुसार ‘राज्यस्तरीय मराठी एकांकिका लेखन स्पर्धा’ आयोजित केली आहे.

( हेही वाचा : मालाडमधील पठाणवाडीचा रस्ता रुंद होतोय! पहिल्या दिवशी २५ बांधकामे हटवली, एकूण १५२ बांधकामे हटवणार)

सदर स्पर्धेसाठी इच्छुकांनी आपल्या नवीन स्वतंत्र एकांकिकेची सुवाच्य pdf प्रत, आणि सोबत ‘सदर एकांकिका, आपले स्वतःचे (अन्य साहित्यावर न बेतलेले) स्वतंत्र नवीन लेखन असून ह्या एकांकिकेचा कुठेही प्रयोग व प्रकाशन झालेले नाही,’ असे अलग हमीपत्र लेखकाने सहीनिशी प्रत्यक्ष अथवा ईमेलने avataran.art@gmail.com ला ५ मार्च २०२३ पर्यंत पाठवायचे आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी ९८६९४५३७०० या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विजेत्यांना २६ मार्च २०२३ रोजी प्रबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृह, बोरिवली येथे जागतिक रंगभूमी दिवसाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ४ वा. होणार्‍या, ‘अवतरण अकादमी’ – च्या “जागतिक रंगभूमी दिवस” सोहळ्यात पारितोषिके प्रदान करण्यात येतील. विजेत्यांनी स्वतः उपस्थित राहून पारितोषिके स्वीकारावीत. या सोहळ्यामध्ये ‘इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्युट’ प्रसारित विश्वविख्यात नाट्यकर्मीच्या आंतर-राष्ट्रीय संदेशाचे जाहीर वाचन केले जाईल. एकांकिका लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण केले जाईल.

नाट्यकलेच्या माध्यमातून गरीब-वंचित वा दूरस्थ-अनागरी बाल-युवावर्गाच्या व्यक्तिमत्त्वविकासाठी अथवा त्यांचे कलागुण जोपासण्यासाठी, अव्यावसायिक स्तरावर लोकोत्तर कार्य करणार्या रंगकर्मीला ‘सौ. भारती सावंत पुरस्कृत’ “नाट्यव्रती अवतरण सन्मान २०२३” (अकरा हजार रुपये, मानपत्र, मानचिन्ह) प्रदान करण्यात येईल. व्यावसायिक नागरी रंगभूमीवर लोकरंगभूमीला प्रतिष्ठा मिळवून देणार्या रंगकर्मीला ‘कै. अशोक कुळकर्णी पुरस्कृत’ “कै. दादा कोंडके अवतरण सन्मान २०२३” (अकरा हजार रुपये, मानपत्र, मानचिन्ह) प्रदान केले जाईल. तसेच ‘अवतरण अकादमी’च्या नाट्यविद्यार्थ्यांच्या नव्या नाट्यकृतीचे सादरीकरण देखील करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here