आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पत्रलेखन, पत्र पाठवणे कमी झाले असले तरीही पिनकोडचे महत्त्व आजही कायम आहे. कोणतीही वस्तू ऑर्डर करायची असल्यास किंवा अगदी आपल्याला ऑनलाइन फूड ऑर्डर करायचे असेल तर पिनकोड खूप महत्वाचा घटक आहे. आपण राहतो त्या विभागाचा पिनकोड हा ६ अंकी असतो. या पिनकोडचा अर्थ काय असतो? पिनकोडची सुरूवात केव्हा झाली, पिनकोड ही संकल्पना अस्तित्वात कोणी आणली याविषयी आपण जाणून घेऊया…
( हेही वाचा : Budget Trip : पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर आणि हटके जागा!)
भारतीय पोस्ट ऑफिसचा इतिहास हा सुमारे १५० वर्षे जुना आहे. संपूर्ण जगात संवादाचे मोठे नेटवर्क म्हणून पोस्ट विभागाकडे पाहिले जाते. पिनकोड किंवा पोस्टल इंडेक्स नंबर कोड म्हणजे भारतातील डाक कार्यालयांना दिलेले सांकेतिक क्रमांक, एका मराठमोळ्या माणसाने पिनकोडची संकल्पना मांडली. श्रीराम भिकाजी वेलणकर यांना ‘पिनकोड’ प्रणालीचे जनक म्हणतात. १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिनकोड पद्धत अंमलात आली.
पिनकोडची गरज
पूर्वी जनरल पोस्ट ऑफिसमध्ये पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांची विभागवार विभागणी केली जात होती. परंतु यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होत होत्या. कर्मचाऱ्याना गावांची नावे कळायची नाही, कधी कोणाचे अक्षर समजून घेण्यास समस्या निर्माण होत असे तसेच संपूर्ण देशभरात अनेक भाषा वापरल्या जातात याच पार्श्वभूमीवर विभागवार पत्रांची विभागणी करण्यासाठी ही पिनकोड पद्धत सुरू करण्यात आली.
पिनकोडची विभागणी कशी झाली ?
पिनकोडची रचना करताना देशात ९ झोन करण्यात आले. यातील ८ भौगोलिक विभाग आहेत तर एक विभाग सैन्यासाठी वापरला जातो.
विभागवार क्रमांक
१ – दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, चंदिगढ.
२ – उत्तर प्रदेश , उत्तराखंड.
३ – राजस्थान, गुजरात, दीव-दमण, दादरा-नगरहवेली.
४ – छत्तीसगढ, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा.
५ – तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, यनाम ( पॉंडिचेरीतील एक जिल्हा).
६ – केरळ, तामिळनाडू, पॉंडिचेरी (यनाम जिल्हा वगळून), लक्षद्वीप.
७ – पश्चिम बंगाल, ओरिसा, आसाम, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, अंदमान-निकोबार दीप समूह.
८ – बिहार, झारखंड.
९ – सैन्य पोस्ट ऑफिस ( Army Post Office- एपीओ).
पिनकोडमधील पहिले दोन क्रमांक खालील क्षेत्र दर्शवतात
- ११ – दिल्ली
- १२ व १३ – हरियाणा
- १४ ते १६ – पंजाब
- १७ – हिमाचल प्रदेश
- १८ ते १९ – जम्मू आणि काश्मीर
- २० ते २८ – उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड
- ३० ते ३४ – राजस्थान
- ३६ ते ३९ – गुजरात
- ४० ते ४४ – महाराष्ट्र
- ४५ ते ४९ – मध्य प्रदेश आणि छत्तीसगड
- ५० ते ५३ – आंध्र प्रदेश
- ५६ ते ५९ – कर्नाटक
- ६० ते ६४ – तामिळनाडू
- ६७ ते ६९ – केरळ
- ७० ते ७४ – पश्चिम बंगाल
- ७५ ते ७७ – ओरिसा
- ७८ – आसाम
- ७९ – पूर्वांचल
- ८० ते ८५ – बिहार आणि झारखंड
- ९० ते ९९ – आर्मी पोस्टल सर्व्हिस
सहा अंकी पिनकोडची रचना
- पहिला अंक – विभाग
- दुसरा अंक – उपविभाग
- तिसरा अंक – वर्गीकृत जिल्हा
- राहिलेले शेवटचे अंक – विशिष्ट पोस्ट ऑफिसचा क्रमांक
पहिल्या दोन अंकावरून पोस्ट ऑफिस किंवा गाव कोणत्या राज्यात आहे ते समजते तसेच पुढील दोन अंकांवरून संबंधित जिल्ह्याची माहिती मिळते. शेवटचे दोन अंक हेड पोस्ट, सब पोस्ट किंवा ग्रामीण पोस्टासाठी असतात.
Join Our WhatsApp Community