ड्रिम ॲडव्हेंचर आयोजित हिमालयीन मोहीम यशस्वी

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात मा. पतालसू या ४,२०० मी. उंचीच्या हिमशिखरावर ५ आॅक्टोबर रोजी यशस्वीरीत्या चढाई करण्यात आली.

आधुनिक काळात गिर्यारोहणासारख्या उत्तुंग क्रीडाप्रकारांचे महत्व उत्तम प्रकारे पटल्याचे वारंवार दिसून येऊ लागले आहे. त्यामुळे त्याचे वारे आता पुणे-मुंबई हे आघाडीचे प्रांत वगळता, महाराष्ट्राच्या इतर भागांतही जोषात वाहू लागले आहेत. ड्रिम ॲडव्हेंचर, सांगली या विख्यात संस्थेमार्फत नुकतेच हिमाचल प्रदेशांतर्गत सोलंगनाला-बियास कुंड या परिसरातील पिरपंजाल पर्वतरांगेत एका भव्य हिमालयीन गिर्यारोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

शिंदे कुटुंबियांनी फडकवला ध्वज

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात माउंट पतालसू या ४ हजार २०० मी. उंचीच्या हिमशिखरावर ५ ऑक्टोबर रोजी यशस्वीरीत्या चढाई करण्यात आली. ही चढाई अत्यंत विशेष मानली जात आहे, कारण या हिमशिखरावर मुंबई पोलिस दलात कार्यरत गिर्यारोहक दांपत्य आनंद शिंदे, सरिता शिंदे यांनी आपल्या आदित्य (१६ वर्षे) व समर्थ (१२ वर्षे) या मुलांसह पहिल्याच प्रयत्नात यशस्वी चढाई करुन राष्ट्रध्वज, पोलिस ध्वज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रणित भगवा ध्वज शिखरमाथ्यावर फडकवून, यशाचा आनंद साजरा केला.

(हेही वाचाः मूर्ती लहान कीर्ती महान… महाराष्ट्रातील चिमुरडीने केले ‘हे’ शिखर सर)

या दोन चिमुरड्यांनीही केला विक्रम

पोलिस दलात यापूर्वी अशी कामगिरी क्वचितच कोणी केली असण्याची शक्यता आहे. या मोहिमेचे अत्यंत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी स्वरुप शेलार १० वर्षे व साई कवडे १२ वर्षे या दोन पुणेकर चिमुरड्यांनी देखील माउंट पतालसू सर केले. स्वरुप शेलारची इतक्या कमी वयातली ही पहिलीच मोहीम असून, साई कवडे याने यापूर्वी आफ्रिका खंडाचे सर्वोच्च हिमशिखर माउंट किलीमंजारो व युरोप खंडाचे सर्वोच्च हिमशिखर माउंट एलब्रुस यांवर चढाई केलेली आहे.

(हेही वाचाः आठ वर्षांच्या मुलाने केले ‘हे’ सर्वोच्च शिखर सर)

यांनी केले यश संपादन

पहिल्या टप्प्यात माउंट पतालसू हिमशिखरावर चढाई करणा-यांमध्ये मुंबई पोलिसातील ज्येष्ठ गिर्यारोहक पोलिस अधिकारी राजू पाटील, महाराष्ट्र पोलिस दलातील तीन झुंजार महिला अधिकारी अंजली राजपूत, सीमा आढाव आणि द्वारका पोटावदे यांच्यासह औरंगाबाद येथील क्रीडाप्रशिक्षक सुरेश त्रिभुवन, वयाच्या ५६व्या वर्षी माउंट एव्हरेस्टसाठी ध्यासमग्न असलेले सांगलीचे अभय मोरे हे बँक अधिकारी, मुंबई अग्निशमन दलाचा तरुण गिर्यारोहक प्रणित शेळके आणि भारतीय सेनादलातील वरिष्ठ अधिकारी कर्नल विवेक अहलावत यांच्यासह मोहिमनेता रफीक शेख यांनी यश मिळवले.

(हेही वाचाः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंचकन्यांचा ‘शिखर ते सागर’ साहसी प्रवास )

जिद्दीने केली हिमशिखराशी ‘फ्रेंडशिप’

मोहिमेच्या पुढील टप्प्यात याच पथकाने ११ ऑक्टोबर रोजी वातावरणीय बदलानुसार अत्यंत कठीण ठरलेल्या माऊंट फ्रेंडशिप (५,२८९ मी.) या हिमशिखरावर देखील यशस्वी चढाई करण्यात यश मिळवले. हिवाळ्याच्या सुरुवातीला ताज्या बर्फाअभावी फ्रेंडशिप शिखरावर यश मिळवणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण मानले जाते. परंतु ड्रिम ॲडव्हेंचरच्या या उच्च प्रशिक्षित व झुंजार पथकाने अत्यंत चिवट जिद्द, भरपूर आत्मविश्वास आणि उत्तम संघभावनेचे प्रदर्शन घडवत माउंट फ्रेंडशिप हे शिखर सकाळी ७.४० वा. सर करण्यात यश मिळवले आहे. इतर ज्येष्ठ सदस्यांसह, स्वरुप शेलार हा अवघ्या १० वर्षांचा सदस्य या हिमशिखरावर यश मिळवणारा पहिला बालगिर्यारोहक ठरला असण्याची शक्यता गिर्यारोहण वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

सुरक्षेला दिले प्राधान्य

माउंट पतालसू व माउंट फ्रेंडशिप हिमशिखरावरील विजयामुळे आत्मविश्वास वाढलेल्या या संघाने आगळीवेगळी विजयादशमी साजरी करण्यासाठी माउंट शितीधार (५ हजार २५० मी.) या अंतिम शिखरावर देखील दस-याच्या दिवशी निकराने चढाई केली. परंतु अचानक वाढलेले तपमान पाहता, वातावरणात घडलेल्या अचानक बदलांमुळे चढाई मार्गावर सुटावलेल्या दगड-दरडींचा धोका मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ४ हजार ७०० मी. पर्यंत यशस्वीरित्या चढाई करुनही केवळ सुरक्षेच्या कारणास्तव हा प्रयत्न सोडून द्यावा लागला. गिर्यारोहणात सुरक्षेला खूप महत्व असल्यामुळे हातातोंडाशी आलेले उत्तम यश सोडून सुरक्षेला प्राधान्य दिल्याच्या कारणास्तव हा संघ कौतुकास पात्र ठरला आहे.

(हेही वाचाः दिव्यांगांनी उंचावली भारतीयांची मान… ‘हे’ शिखर केले सर)

ड्रिम ॲडव्हेंचरच्या या विशेष मोहीम पथकास औरंगाबाद दूरदर्शनचे ६० वर्षीय सेवानिवृत्त संचालक जब्बार पठाण यांनी एक पायाने अधू असूनही अत्यंत मोलाची साथ दिली. मुंबई पोलिस दलातील आघाडीचे गिर्यारोहक आनंद शिंदे व सरिता शिंदे या अनुभवी गिर्यारोहक दांपत्याचे मार्गदर्शन लाभलेल्या या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व महाराष्ट्र पोलिस दलाचे पहिले एव्हरेस्टवीर रफीक शेख यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here