एखाद्याला नुकसान भरपाई म्हणून २ कोटी मिळत असेल तर त्यासाठी कारणही तसेच असणार किवा ज्याच्या बदल्यात इतकी नुकसान भरपाई मागितली जात असेल ती वस्तूही तितकीच महत्वाची असणार, पण जर जास्तीचे केस कापले म्हणून २ कोटींची नुकसान भरपाई मिळावी अशी कुणी मागणी केली आणि ग्राहक आयोगाने ती मान्य केली तर, असे घडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी, १७ मे रोजी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या (NCDRC) आदेशाला स्थगिती दिली. या आदेशात एका मॉडेलला आयटीसी समूहाच्या मालकीच्या हॉटेलमध्ये जास्त केस कापल्याबद्दल भरपाई म्हणून 2 कोटी रुपये देण्यास सांगितले होते.
न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांच्या खंडपीठाने एनसीडीआरसीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या आयटीसीच्या अपीलवर मॉडेल आशना रॉय यांना नोटीस बजावली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की नुकसान भरपाई केवळ तोंडी नसून भौतिक पुराव्यावर आधारित असावी. NCDRC ने 21 सप्टेंबर 2021 रोजी कंपनीला भरपाई म्हणून 2 कोटी रुपये देण्याच्या निर्देशाला दुजोरा दिला होता. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये NCDRCचा आदेश रद्द केला होता. तसेच, न्यायालयाने NCDRC ला त्या मॉडेलने दाखविलेल्या पुराव्यांच्या आधारे या मुद्द्यावर विचार करण्यास सांगितले होते.
काय आहे हे प्रकरण?
मॉडेल आशना रॉयच्या म्हणण्यानुसार, ती 12 एप्रिल 2018 रोजी नवी दिल्लीतील हॉटेल आयटीसी मौर्या येथील केशरचना सलूनमध्ये गेली होती. त्या दिवशी हेअर ड्रेसर सलूनमध्ये नव्हता जो नियमितपणे तिचे केस करायचा. यानंतर तिच्या हेअर ड्रेसिंगचे काम दुसऱ्या हेअर ड्रेसरकडे सोपवण्यात आले. आशनाने सांगितले की, तिने केशभूषाकाराला आपले केस कसे कापायचे ते सांगितले. हेअरस्टाइलचे काम पूर्ण झाल्यावर आशनाच्या लक्षात आले की हेअर ड्रेसरने तिचे केस खूप कापले आहेत. तिच्या डोक्यावर फक्त 4 इंच केस राहिले. तिचे केस जेमतेम खांद्याला स्पर्श करत होते. जे तिने सांगितल्यानुसार मुळीच नव्हते.
Join Our WhatsApp Community