राष्ट्रीय युवा दिवस दरवर्षी 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो. ज्यांच्याकडे देशाचे भविष्य चांगले आणि निरोगी बनवण्याची क्षमता आहे, त्यांना म्हणजेच भारतातील तरुणांना समर्पित केलेला हा एक विशेष दिवस आहे. 12 जानेवारी या दिवशी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. स्वामी विवेकानंद यांची जयंती देशातील तरुणांच्या नावाने समर्पित करून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून केव्हा साजरी करण्यात आली? स्वामी विवेकानंद कोण आहेत? त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्याचे कारण आणि इतिहास काय आहे हे जाणून घ्या.
स्वामी विवेकानंद कोण होते
स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला. स्वामी विवेकानंदांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त होते. ते वेदांताचे प्रख्यात आणि प्रभावशाली आध्यात्मिक गुरु होते. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड निर्माण झाली. विवेकानंद 25 वर्षांचे झाले, तेव्हा त्यांनी सांसारिक आसक्तीचा त्याग केला आणि ते संन्यासी झाले. संन्यासी झाल्यानंतर त्यांचे नाव विवेकानंद ठेवण्यात आले. 1881 मध्ये विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांची भेट घेतली.
स्वामी विवेकानंदांचे प्रभावशाली भाषण
11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेत धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये स्वामी विवेकानंददेखील सहभागी झाले होते. तिथे त्यांनी ‘अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो’ म्हणत भाषणाला सुरुवात केली. शिकागोच्या आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये पूर्ण दोन मिनिटे त्यांच्या भाषणावर टाळ्यांचा कडकडाट झाला. ज्याची भारताच्या इतिहासात अभिमानाची आणि सन्मानाची घटना म्हणून नोंद झाली.
युवा दिन का साजरा केला जातो?
स्वामी विवेकानंदांना अष्टपैलू म्हणतात. ते धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, कला, समाजशास्त्र, साहित्य यांचे जाणकार होते. शिक्षणात चांगले असण्यासोबतच त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचेही ज्ञान होते. याशिवाय विवेकानंद चांगले खेळाडूसुद्धा होते. अनेक प्रसंगी त्यांनी आपल्या अनमोल विचारांनी आणि प्रेरणादायी शब्दांनी तरुणांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. म्हणूनच स्वामी विवेकानंदांची जयंती हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.
( हेही वाचा :तुम्हाला कोरोना झालाय? उपचारात ‘या’ औषधाचा चुकूनही करू नका समावेश )
राष्ट्रीय युवा दिन कधी आणि कसा सुरू झाला
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस तरुणांना समर्पित करण्याची सुरुवात 1984 पासून झाली. स्वामी विवेकानंदांचे तत्त्वज्ञान, आदर्श आणि कार्यपद्धती भारतीय तरुणांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. म्हणून 1984 पासून स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्याची घोषणा करण्यात आली.
Join Our WhatsApp Community