संध्याकाळच्या आकाशामध्ये सध्या शुक्र, शनि, गुरु आणि मंगळ हे मुख्य ग्रह नुसत्या डोळ्यांनी दिसत आहेत. या ग्रहांची शास्त्रीय माहिती तसेच या ग्रहांचे दुर्बिणीतून निरीक्षण करायला मिळावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. खगोल मंडळ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील सावरकर स्मारकाच्या प्रांगणात रविवार, १ जानेवारी २०२३ या दिवशी सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी दुर्बिणीतून आकाशनिरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला.
बहुभाषिक प्रेक्षकांचे शंकासमाधान करण्याचा प्रयत्न
शनि ग्रहाची वलये तसेच गुरुग्रहाचे चार प्रमुख चंद्र यांचे दुर्बिणीतून निरीक्षण घडवले गेेले. चंद्रावर दिसणाऱ्या विवरांचे दुर्बिणीतून निरीक्षण घडवले. या निमित्ताने खगोलशास्त्राशी संबंधित अनेक शंका व प्रश्न यांचे समाधान खगोल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले. आकाशातील काही निवडक तारकासमूह तसेच ध्रुव तारा ओळखण्याची पद्धत यावेळी सांगण्यात आली. यावेळी खगोल मंडळाचे १० कार्यकर्ते आणि त्यांच्या दुर्बिणी यांच्या सहाय्याने हा आगळा आकाश निरीक्षणाचा कार्यक्रम करण्यात आला. उपस्थित प्रेक्षक वर्गामध्ये केवळ मराठीच नव्हे तर हिंदी, इंग्रजी आणि गुजराती अशा बहुभाषिक अनेक प्रेक्षकांचे शंकासमाधान करण्याचा प्रयत्न खगोल मंडळाने केला. खगोलशास्त्राच्या प्रसार आणि प्रचारासाठी तसेच समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, यासाठी अशा प्रकारचे अनेक उपक्रम खगोल मंडळ तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने यापुढे सुरू राहातील.
Join Our WhatsApp Community