शनिवारी सकाळी स्वाती ढुमणे या वनरक्षकावर झालेल्या हल्ल्यानंतर या हल्ल्यामागे ताडोबा-अंधेरी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटकांची सर्वात आवडती ‘माया’ वाघीणीचे नाव समोर येत आहे. नेमका हल्ला कोणी केला, याबाबत वनविभागाने गुप्तता पाळली आहे. हल्ल्यानंतरही ‘माया’ शनिवारपासून पर्यटकांच्या वाहनासमोरही येत आपलं दर्शन देतेय. नक्की ‘माया’ कशीय हे जाणून घ्या…
मायाची माया
‘लीला’ आणि ‘हिलटोप’ या वाघाच्या जोडीची ‘माया’ ही मुलगी म्हणून ताडोबात सर्वांना परिचित आहे. ‘माया’ वर्षभराची झाल्यानंतर दुचाकीसमोरही सहजतेने बसून राहायची. वाघ म्हटला तर रागावर फारसं नियंत्रण नसतं, अशातच माया सर्व पर्यटकांच्या वाहनांसमोर सहज यायची. कित्येक वन्यजीव छायाचित्रकारांनी ‘माया’च्या वेगवेगळ्या छटा सहज टिपल्या आहेत.
साधारणतः दहा वर्षांचं वयोमान असलेल्या ‘माया’ वाघीणीने आतापर्यंत चार वेळा बछडे जन्माला घातले आहेत. ‘गब्बर’, ‘नामदेव’, ‘मटकासूर’ हे तीन जोडीदार ‘माया’ला ताडोबात भेटले. त्यापैकी ‘मटकासूर’ आणि ‘माया’ची जोडी सर्वांची आवडती. चौथ्या वेळी गरोदरपणानंतर चक्क पाच बछडे जन्माला घातल्यानंतर ‘माया’च्या प्रसिद्धीत अजूनच भर पडली. ‘माया’ ही ‘इन्स्टाग्राम’ आणि ‘ट्विटर’ या सोशल मीडिया माध्यमांवरील वन्यजीव छायाचित्रकारांच्या फोटोत हमखास सापडते. त्यामुळे जगभरातील पर्यटक खास मायाला पाहण्यासाठी ताडोबाला भेट देतात.
‘माया’बाबतचे वाद
मायाकडून स्वाती ढुमणे या वनरक्षकावर पहिल्यांदाच हल्ला झाला आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचं म्हणणं आहे. याआधीही ‘मटकासूर’ आणि ‘माया’ यांचा एकत्र वावर असलेल्या ठिकाणी एका वनमजुराचा बळी गेला आहे. ‘मटकासूर’ आणि ‘माया’ मिलनकाळात असताना नजीकच वनमजूर नैसर्गिकविधीसाठी गेला होता. त्यावेळी वनमजूराला नेमक्या कोणत्या वाघाने मारले, हे अद्यापही कोणालाच खात्रीलायकपणे सांगता आलेले नाही.
( हेही वाचा : वाघाच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू, ताडोबातील घटना )
वाघाच्या जंगलात सर्वांनी सांभाळून रहावे
स्वाती ढुमणे या वनरक्षकावर ताडोबातील कोलारा या कोअर क्षेत्रात हल्ला झाला. कोअर क्षेत्र अतिसंरक्षित असल्यानं या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास मनाई असते. जंगलात टेहळणी करताना वनअधिकारी तसेच पर्यटकांनीही सांभाळून रहावे. अचानक वन्यजीव समोर येणे ही वनअधिका-यांसाठी नवी गोष्ट नाही. मात्र मानव-प्राणी संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी सर्वांनी घ्यावी. व्याघ्र प्रकल्प आठवड्यातून एकदा तरी बंद ठेवावे, जेणेकरुन वाघ आणि इतर प्राण्यांना एका दिवसासाठी मुक्त संचार करता येईल.
Join Our WhatsApp Community