जगाच्या कानाकोपऱ्यातील लोक २१ जून रोजी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची उत्सुकतेने वाट पहात आहेत. या वर्षीच्या योग दिवसाची संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकमसाठी योग’ म्हणजेच ‘एक विश्व-एक कुटुंब’ या कल्पनेसह सर्वांच्या कल्याणासाठी योग ही आहे. तुम्ही तुमच्या जीवनात योगाचा स्वीकार करा, दिनचर्येत योगाचा समावेश करा. अजूनही तुम्ही योगसाधनेशी जोडले गेला नसाल, तर २१ जून ही या संकल्पासाठी उत्तम संधी आहे. तुम्ही जेव्हा योगा करणे सुरु कराल, तेव्हा तुमच्या जीवनात किती मोठे परिवर्तन येईल ते तुम्ही बघालच, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘मन की बात’च्या १०२ व्या भागातून त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला.
योगा दिवसानिमित्त भरपूर उत्साह
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, सर्वांना जोडून ठेवणाऱ्या आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणाऱ्या योगाच्या भावनेला ही संकल्पना व्यक्त करते. दरवर्षीप्रमाणेच या वर्षी देखील देशभरात ठिकठिकाणी योगाशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळेस मला संयुक्त राष्ट्रांच्या न्युयॉर्क येथील मुख्यालयात योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. मला दिसतंय की, समाज माध्यमांवर देखील योग दिनाच्या संदर्भात भरपूर उत्साह दिसून येतो आहे.
I urge you all to mark Yoga Day and make Yoga a part of your daily lives. #MannKiBaat pic.twitter.com/OG8NZEBtau
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2023
चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानातून लवकर सावरतील!
बिपरजॉय चक्रीवादळाबाबत मोदी म्हणाले की, दोन-तीन दिवसांपूर्वी देशाच्या पश्चिम भागामध्ये खूप मोठं चक्रीवादळ आलं होतं. गुजरातच्या कच्छ भागामध्ये बिपरजॉय चक्रीवादळामुळे खूप नुकसान झाले. परंतु कच्छच्या लोकांनी ज्या धैर्याने आणि सतर्कतेने या चक्रीवादाळाशी लढा दिला तो तितकाच अभूतपूर्व आहे. एकेकाळी दोन दशकांपूर्वी झालेल्या भूकंपानंतर कच्छ कधीही सावरणार नाही, असे म्हटले जात होते. परंतु आज हाच जिल्हा देशातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मला खात्री आहे की, कच्छचे लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानातून लवकर सावरतील.
(हेही वाचा – Heat Wave : उत्तर प्रदेशात उष्णतेचा हाहाकार; तीन दिवसांत उष्माघाताचे ५४ बळी)
क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचा संकल्प करा!
भारताने २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प नक्कीच खूप मोठा आहे. एक काळ असा होता की, क्षयरोगाविषयी समजल्यानंतर कुटुंबातील सदस्य दूर निघून जायचे, पण आजच्या काळात क्षयरोगाविषयी समजले की, कुटुंबातील लोकं रुग्णाची व्यवस्थित काळजी घेतात.
आणीबाणीच्या काळातील गोष्टींबाबत तरुण पिढीला समजले पाहिजे!
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीच्या काळावर देखील त्यांनी भाष्य केले. पंतप्रधान म्हणाले की, आणीबाणीच्या काळाला आपण कोणीच कधीच विसरु शकत नाही. हा भारताच्या इतिहासातील एक वाईट काळ होता. अनेकांनी या गोष्टीला विरोध करण्यासाठी आपली शक्ती लावली होती. त्यावेळी लोकशाहीवर एवढा अन्याय करण्यात आला होता, आजही त्या गोष्टीची आठवण झाली की, अंगावर काटे येतात. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना या गोष्टींवर देखील नजर फिरवायला हवी. या गोष्टीच तरुण पिढीला लोकशाहीचा अर्थ आणि महत्त्व शिकवण्यास मदत करतील.
रथयात्रा श्रद्धेसह ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ कल्पनेचे देखील प्रतिबिंब!
मंगळवार, २० जून रोजी ऐतिहासिक रथयात्रा सुरु होते आहे. रथयात्रेला संपूर्ण जगात एक विशिष्ट ओळख मिळालेली आहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये मोठ्या धुमधडाक्यात भगवान जगन्नाथांची रथयात्रा निघते. ओदिशा राज्यातील पुरी येथे होणारी रथयात्रा तर अत्यंत अद्भुत असते. मी जेव्हा गुजरातेत होतो, तेव्हा मला अहमदाबाद येथे निघणाऱ्या विशाल रथयात्रेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळत असे. या देशभरातील रथयात्रांमध्ये ज्या प्रकारे सर्व समाजांचे, सर्व वर्गातील लोक सहभागी होतात ती अत्यंत अनुकरणीय पद्धत आहे. ही रथयात्रा लोकांच्या श्रद्धेसह ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ कल्पनेचे देखील प्रतिबिंब असते. या अत्यंत पवित्र प्रसंगी माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भगवान जगन्नाथ सर्व देशवासियांना उत्तम आरोग्य आणि सुख-समुद्धीचा आशीर्वाद देवो, हीच सदिच्छा मी व्यक्त करतो.
पावसाळ्यात तब्येतीची काळजी घ्या, योगसाधना करा!
पावसाचे दिवस आहेत म्हणून स्वतःच्या तब्येतीची नीट काळजी घ्या. समतोल आहार घ्या आणि निरोगी राहा. योगसाधना नक्की करा. आता अनेक शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील संपत आल्या असतील. मी मुलांना देखील सांगेन की गृहपाठ शेवटच्या दिवसापर्यंत शिल्लक ठेवू नका. ते काम संपवून टाका आणि निश्चिंत व्हा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community