यंदा दिवाळीत हरित फटाके बाजारात मोठ्या प्रमाणात आणले गेले आहेत. यंदा पर्यावरणपूरक दिवाळीची जय्यत तयारी झाली असली तरीही फटाके फोडताना स्वतःची काळजी घेण्याकडेही दुर्लक्ष नको, असा प्रेमळ सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. फटाके फोडताना बरेचदा डोळ्यांच्या दुखापतींच्या तक्रारी वाढतात. त्यामुळे फटाके फोडताना हातापायावर फटाके फुटणार नाही ही काळजी घेताना डोळ्यांनाही जपा, असा सल्ला वडाळा येथील आदित्यज्योत रुग्णालयाचे प्रमुख प्रा. डॉ. एस. नटराजन यांनी दिला आहे.
फटाक्यांचे स्फोट बेभरवशाचे असल्यामुळे अगदी काळजी घेऊन फटाके उडवणाऱ्यांनाही दुखापती होऊ शकतात. दिवाळीच्या काळात फटाक्यांनी होणाऱ्या बहुतेक दुखापतींचा डोळ्यांवर थेट परिणाम होतो, फटाक्यांमुळे डोळ्यांना गंभीर दुखापती होतात. दृष्टीला होणाऱ्या दुखापती दरवर्षी मोठ्या संख्येने नोंदवल्या जातात आणि त्या प्रामुख्याने फटाक्यांमुळे होतात. फटाके हाताळणा-यांसह नजीक उभ्या असलेल्या माणसांनाही ५० टक्के डोळ्यांच्या दुखापतीची शक्यता असते. कित्येकदा फटाखे फुटून रस्त्यावर चालणा-या व्यक्तीवर पडल्याच्या घटना पाहायला मिळतात.
दुखापतीचे प्रकार –
फटाक्यांमध्ये मिसळलेल्या गन पावडरमधील रसायनांमुळेही डोळ्यांना दुखापती होतात. सातत्याने धूर येत ऱाहिल्यामुळे डोळे चुरचुरतात आणि त्यातून पाणी येते. फटाक्यांतून येणाऱ्या धुरामुळे लॅरिंजायटिस व अन्य काही प्रकारचे प्रादुर्भाव घशामध्ये होतात. नेत्र दुखापतींची तीव्रता नेत्रपटलावर ओरखडा उमटण्यापासून रेटिनाला होणारे गुंतागुंतीचे आजार ते अंधत्वापर्यंत दिसून येतात.
(हेही वाचा राज्य सरकारच्या आरोग्य विभागात 10 हजार पदांची भरती होणार, असे आहे वेळापत्रक)
डोळ्यांना होणाऱ्या प्रमुख दुखापती
- ओपन ग्लोब दुखापत- ही आय वॉल अर्थात नेत्र भित्तिकेला होणारी ‘फुल थिकनेस’ दुखापत असते.
- क्लोज्ड ग्लोब दुखापत – ही नेत्र भित्तिकेच्या संपूर्ण जाडीला छेद न देता झालेली दुखापत असते.
- जळजळ- डोळ्याभवती खरचटणे
- लॅमेलर लॅक्रिएशन- नेत्र भित्तिकेच्या जाडीवर अंशत: परिणाम करणारी जखम
- लॅक्रिएशन- टोकदार घटकामुळे नेत्र भित्तिकेच्या संपूर्ण जाडीला होणारी दुखापत
- पेनिट्रेटिंग (खोलवर) दुखापत- ही ‘एण्ट्रन्स वुंड’सह झालेली ओपन ग्लोब दुखापत असते.
- डोळ्याच्या आतमध्ये बाह्यघटक गेल्यामुळे होऊ शकणारी दुखापत ((IOFB) आणि ग्लोब फुटणे यांसारख्या दुखापतींसाठी रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेणे आवश्यक ठरते. रुग्णालयात दाखल करून घेऊन रुग्णाचे निरीक्षण व पुढील व्यवस्थापन केले जाते.
हे करा आणि हे करू नका
- डोळे चोळू नका किंवा त्यावर ओरखडे येऊ देऊ नका.
- डोळे आणि चेहरा व्यवस्थित धुवा.
- डोळ्यांची चुरचुर होत असेल किंवा काही बाह्यघटक डोळ्यात गेला असेल, तर पापण्या पूर्ण उघडून धरा आणि डोळ्यांवर वारंवार पाण्याचे शिपके द्या.
- बाह्यघटक मोठा असेल किंवा डोळ्यात चिकटला असेल, तर तो काढण्याचा प्रयत्न करू नका.
- डोळे मिटलेले ठेवा आणि नेत्रविकारतज्ज्ञांकडे जा.
- डोळ्यात कोणतेही रसायन गेले असेल, तर तत्काळ डोळे व पापण्यांभवतीचा भाग पाण्याने ओला करा आणि 30 मिनिटे पाणी लावत राहा. तत्काळ नेत्रविकारतज्ज्ञांना दाखवा.
- लहान मुलांबाबत- हे करा आणि हे करू नका
- दुखापत झालेला डोळा चोळू नका. त्यामुळे रक्तस्राव वाढू शकतो किंवा दुखापत आणखी तीव्र होऊ शकते.
- दुखापतग्रस्त डोळ्यावर कोणताही दाब देऊ नका. अशा परिस्थितीत फोम कप किंवा ज्यूसच्या कार्टनचा तळ डोळ्यावर धरणे किंवा बांधणे या दोनच गोष्टी केल्या जाऊ शकतात.
- वेदनाशामकांसह कोणतीही ओटीसी औषधे देऊ नका.
- कोणतेही ऑइंटमेंट लावू नका. त्यामुळे डॉक्टरांना डोळा तपासणे व दुखापतीबाबत निदान करणे कठीण होऊन बसते.
- मुलांना मार्गदर्शन किंवा देखरेखीखालीही फटाक्यांशी खेळण्याची परवानगी देऊ नका.
सावधगिरी बाळगा - फटाके नेहमी मोकळ्या जागेत वाजवा, गॉगल्स घाला, स्वच्छ पाण्याने हात धुवा.
- लहान मुले फटाके वाजवत असताना मोठ्यांनी लक्ष द्यावे. कोणतीही दुखापत सहजपणे घेऊ नका; डॉक्टरांना दाखवा व प्रोफेशनल मदत घ्या.
- अपघाताने आग लागल्यास पाण्याने भरलेली बादली व वाळू लगेच सापडेल अशा ठिकाणी सज्ज ठेवा.
- फटाके सुरक्षित जागी बंद खोक्यात आणि लहान मुलांच्या हाताला लागणार नाहीत असे ठेवा.
- फटाके चेहरा, केस व कपड्यांपासून दूर ठेवा.
- फटाके वाजवताना कृत्रिम धाग्यांपासून (सिंथेटिक) तयार केलेले कपडे घालू नका.
- फटाके वाजवताना ते किमान हातभर लांब राहतील याची काळजी घ्या आणि फटाके वाजताना बघायला उभे राहताना किमान पाच मीटर्सचे अंतर ठेवा.
- फटाके वाजवण्यासाठी जाताना काँटॅक्ट लेन्सेस काढून ठेवा. त्याऐवजी चष्मा वापरा. चष्म्याने तुमच्या डोळ्यांचे संरक्षणही अधिक चांगल्या प्रकारे होईल.
- फटाक्यांची विल्हेवाट लावण्यापूर्वी ते पाण्याने भरलेल्या बादलीत घालून निष्क्रिय करा.
- जळलेले फटाके अपघाताने पायाखाली येऊन जखम होऊ नये म्हणून नेहमीच उत्तम पादत्राणे वापरा.