नाताळ अवघ्या पाच दिवसांवर असताना विदर्भातील पारा दहा अंशाखाली गेला आहे. सोमवारी विदर्भातील बहुतांश भागांतील किमान तापमान दहा अंशाखाली सरकल्याने विदर्भकरांना चांगलीच हुडहुडी भरली. सोमवारी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद नागपूर येथे ७.८ अंश सेल्सिअसएवढी झाली. सरासरीपेक्षाही चार अंश कमी तापमान नोंदवले गेल्याने, नागपूरकरांची सकाळीच काकड आरती झाली. सोमवारची सकाळ नागपूरकरांसाठी गारठवणा-या थंडीची ठरली.
नागपूर खालोखाल वर्धा, गोंदिया आणि अमरावतीत किमान तापमान दहा अंशाच्याही खाली गेले. गोंदियात किमान तापमान ८.२ अंश सेल्सिअस, अमरावती येथे ८ अंश सेल्सिअस, वर्ध्यात ९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान उतरले होते. विदर्भातील इतर भागांतही तापमान सरासरीच्या खालीच नोंदवले गेले. ब्रह्मपुरीत १० अंश सेल्सिअस एवढी किमान तापमानाची नोंद झाली. बुलढाण्यात १०.५ अंश सेल्सिअसएवढे किमान तापमान नोंदवले गेले. तर अकोला येथे ११.३, चंद्रपुरात ११.४, गडचिरोलीत ११.६ तर यवतमाळमध्ये १२.५ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाची नोंद झाली.
( हेही वाचा: आता ऐश्वर्या बच्चन ईडीच्या रडारवर! काय आहे भानगड? )
विदर्भातील किमान तापमानासह कमाल तापमानातही घट
विदर्भात किमान तापमानातील घट ही उणे तीन ते चार अंशाने खाली घसरल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. कमाल तापमानही आज सायंकाळी ब-यापैकी कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील दोन ते तीन दिवस विदर्भात तापमान कमीच राहील, अशी शक्यता आहे. सोमवारी देशातील सर्वात कमी तापमान राजस्थान येथे नोंदवले गेले. राजस्थान पश्चिम येथील चुरु येथे -२.६ अंश सेल्सिअसपर्यंत पा-याने खाली डुबकी मारली.
राज्यात या भागांतही वाढली थंडी
विदर्भातील बहुतांश भागांतील पारा दहा अंशाखाली गेला असला, तरीही राज्यातील सर्वच भागांत गारठवणारी थंडी अद्यापही सुरु झालेली नाही. कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रातील काहीच भागांत थंडीचा प्रभाव जास्त आहे. सोमवारी नाशकात ११.४ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. मध्य महाराष्ट्रातील साता-यात १२ अंश सेल्सिअस, पुण्यात ११.२ अंश सेल्सिअस, तर नांदेडमध्ये १३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. चिखलदरा येथे किमान तापमान १०.६ अंशापर्यंत नोंदवले गेले. कोकणातील किमान तापमान १८ ते २२ अंशापर्यंत दिसून येत आहे. कोकणात गारठवणारी थंडी अद्यापही सुरु झालेली नाही. परंतु किनारपट्टीवरील वा-यांच्या प्रभावामुळे सायंकाळी थंडी चांगलीच जाणवत आहे.
Join Our WhatsApp Community