हिवाळ्याची लागतेय अलगद चाहूल; किमान तापमानात होतेय घट

मंगळवारी पहिल्यांदाच मुंबईचे किमान तापमान २०.२ (सांताक्रूझ केंद्र) अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले.

राज्यात आता सकाळच्या प्रहरी थंडीची अलगद चाहूल लागली आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानात आता लक्षणीय घट नोंदवली जात असून, कोकणातही आता किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र १२ नोव्हेंबरपासून राज्यात तुरळक ठिकाणी पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पहिल्यांदाच मुंबईचा किमान पारा वीस अंशावर

मंगळवारी पहिल्यांदाच मुंबईचे किमान तापमान २०.२ (सांताक्रूझ केंद्र) अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदाच मुंबईचा किमान पारा वीस अंशावर नोंदवला गेला. मुंबईच्या कुलाबा केंद्रात किमान पारा २३.५ अंश सेल्सिअस, डहाणूत २१ अंश सेल्सिअस तर कोकणातील उर्वरित पट्ट्यांत रत्नागिरीत २१.२ अंश सेल्सिअसवर किमान पारा खाली उतरला. कमाल तापमान बहुतांश ठिकाणी ३२ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले.

(हेही वाचा : अहमदनगर जिल्हा रुग्णालयावर कारवाईचा बडगा! पुढे काय?)

पुण्यात किमान तापमान १२.४ अंश सेल्सिअसवर

मध्य महाराष्ट्रातील किमान पारा वीस अंशाच्याही खाली उतरल्याची नोंद भारतीय हवामान खात्याने केली. पुण्यात किमान तापमान १२.४ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. राज्यातील सर्वात किमान तापमानाची नोंद पुण्यात झाली. माथेरानमध्ये १८.६ अंश सेल्सिअस, साता-यात १६.९ अंश सेल्सिअस, कोल्हापूरात १८.५ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. विदर्भात मात्र किमान तापमानात अद्यापही फारशी घट झालेली नाही. राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत मराठवाडा आणि विदर्भातील किमान तापमानातील घट किंचित म्हणायला हवी, अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या अधिका-यांनी दिली. या दोन्ही पट्ट्यांतील किमान तापमान १४ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान आहे.

हवामानाचा अंदाज

  • १२ नोव्हेंबर – कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
  • १३ नोव्हेंबर – राज्यात सर्वत्र तुरळक पावसाची शक्यता

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here