कोरोना काळात कोविडविरोधात प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी एकामागोमाग एक काढ्याचा मारा करणाऱ्यांना आता डॉक्टरांच्या दारी जावे लागत आहे. या रुग्णांना गॅस्ट्रो, गंभीर अवस्थेतील अॅसीडीटी आणि अल्सरचा आजार झाल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. दोन वर्षांच्या कोरोना काळानंतरही काढ्याचे दुष्परिणाम दिसत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
( हेही वाचा : बेस्टच्या सामायिक कार्डकडे प्रवाशांनी फिरवली पाठ )
अंगात उष्णता वाढल्याने गंभीर अॅसीडीटी झालेल्या रुग्णांची नोंद होत असल्याची माहिती खार येथील हिंदूजा रुग्णालयाचे संचालक व सर्जिकल गॅस्ट्रोएन्टोलोजिस्ट डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. ही अंगातील वाढती उष्णता केवळ काढ्याच्या अतिसेवनामुळे आहे, हे ठोसपणे सांगता येत नाही असेही डॉ. सुपे म्हणाले. मात्र काढ्याच्या दुष्परिणामामध्ये पोटात गॅस होणे, पोट दुखणे अशा तक्रारीही वाढल्याची माहिती चेंबूरच्या झेन रुग्णालयाचे संचालक व गॅस्ट्रोइन्टेस्टाएनल सर्जन डॉ. रॉय पाटणकर यांनी दिली. दर दिवसाला बाह्यरुग्ण विभागातील १० टक्के रुग्णांमध्ये काढ्याच्या अतिसेवनाने शरीरात उद्भवलेल्या आजारांच्या समस्या दिसून येत असल्याची माहितीही डॉ. रॉय पाटणकर यांनी दिली.
कोविड असो वा दुसरा कोणताही आजार, माणसाच्या शरीरात पुरेशी रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी केवळ काढ्यावरच अवलंबून राहणे योग्य नाही. आवळा किंवा फळांच्या माध्यमातून क जीवनसत्त्वाचे सेवन केल्यास शरीरात रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होते. परंतु कोरोनाच्या भीतीपोटी आजही काढा पिण्याचे प्रमाण सर्रास आढळते. काढा बनवण्याची प्रक्रिया आणि प्रमाण याबाबत केंद्रीय आयुष मंत्रालयाने अगोदरच माहिती दिली आहे. काढा सतत आणि दर दिवसाला तीन ते चार वेळा पिणे योग्य नाही. परिणामी अंगात जास्त उष्णता निर्माण होत असल्याने आता गॅस्ट्रो, अॅसीडीटी आणि अल्सरचे रुग्ण आढळत असल्याची माहिती आहारतज्ज्ञ डॉ. रुबी सौंद यांनी दिली.
अल्सरची लक्षणे
- सतत उलट्या होणे
- वजन कमी होणे
- विष्ठा काळ्या रंगाची होणे
- विष्ठेतून रक्त जाणे
रुग्णाने तातडीने पोटाची एन्डोस्कॉपी ही चाचणी करुन घ्यावी. कित्येकदा रुग्णाच्या शरीरात रक्ताचा तुटवडाही भासू शकतो. काही रुग्णांना नवे रक्तदेखील शरीरात द्यावे लागते.
– डॉ रॉय पाटणकर
अल्सर उद्भवल्यास खाण्याचे नियम
- काढा पिणे तातडीने थांबवा
- साधे अन्न खा. फायबरयुक्त अन्नाचे सेवन करा
- कच्चे सलाड खाऊ नका.
- मसालेदार अन्नपदार्थ वर्ज्य करा