कोकणात सापडला हजारो वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वारसा

कोकणातील नैसर्गिक सौंदर्याची ख्याती जगभरात प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने ही विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. अशी ही वैविध्यपूर्ण कातळशिल्पे महाराष्ट्रात विशेषत: कोकणात पाहायला मिळतात. प्राचीन संस्कृतीचा वारसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणातील ५२ कातळशिल्पांचा ठेवा लवकरच जगासमोर येणार आहे.

जागतिक वारसा सप्ताह

रत्नागिरी, लांजा, राजापूर येथील कातळशिल्पांचा विकास सुरू झाल्यानंतर आता तळकोकणातील सिंधुदुर्गातील कातळशिल्पांचा शोध घेण्यात येणार आहे. कोकणातील कातळशिल्पांना जागतिक वारसा स्थळे म्हणून युनेस्कोने तत्वत: मान्यता दिली आहे. कातळशिल्पांबाबत अधिक माहिती जनतेला कळावी, या हेतूने राज्यात १९ ते २५ नोव्हेंबरपर्यंत ‘जागतिक वारसा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या कातळशिल्पांना पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक आवर्जून कोकणाला भेट देतात.

पुरातत्व विभागाची माहिती

राज्याच्या पुरातत्व विभागाने कोकणातील ११७ गावांमधील ५२ कातळशिल्पांचा शोध घेतला असून, यातील १७ शिल्पांचा विकास करण्यास सुरूवात झालेली आहे. अशी माहिती पुरातत्व विभागाकडून देण्यात आली आहे. यानुसार पुरातत्व विभाग कातळशिल्पांभोवती चौकटी आखणे, मार्ग विकसित करणे अशा सुविधा निर्माण करणार आहे.

( हेही वाचा : सौंदर्यप्रसाधनाची जाहिरात भोवली, एफडीएने केला ४८ लाखांचा माल जप्त )

कातळशिल्पे म्हणजे काय ?

कोकणात आदिमानवाने दगडावर किंवा जमिनीवर कोरलेली शिल्पे कातळशिल्पे म्हणून ओळखली जातात. कोकणातील कातळशिल्पातील प्राणी व पक्ष्यांच्या आकृत्यांचा विचार करता भारतात अन्यत्र आढळून येणा-या शिल्पांच्या तुलनेत हे आकार मोठे आहेत. या सर्व रचना या कातळाच्या जमिनीच्या पृष्ठभागावर आडव्या पद्धतीने कोरल्या गेल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here