तुम्हाला शरीरात थकवा जाणवतोय… तुमची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलीय…. तुम्हांला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचं निष्पन्न झालंय. तब्बल नऊ दिवसाच्या तपासणीनंतर ओमायक्रॉनचं लक्षण डॉक्टरांनी शोधून काढलंय. दक्षिण आफ्रिकेच्या वैद्यकीय परिषदेनं ओमायक्रॉनबाबत अधिक स्पष्टता दिलीय. मात्र या विषाणूची गंभीरता जाणून घेण्यास अजून आठवड्याचा अवधी जाईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय. मात्र अद्यापही या विषाणूमूळं एकही मृत्यूची नोंद नसल्याचंही वैद्यकीय वर्तुळातून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे घाबरु नका, असं आवाहन डॉक्टरांनी केलंय.
अशी आहेत लक्षणं
ओमायक्रॉनच्या लक्षणाबाबत जगभरातून संशोधन सुरु असताना ही माहिती समोर आलीय. या विषाणूमध्ये शरीरात मोठ्या प्रमाणात थकवा येतोय. थकव्यासोबत अंगही दुखू शकतं. काही केसेमध्ये डोकेदुखी आणि आळसाळलेपणाही आढळून आलाय. परंतु ओमायक्रॉन कोरोनाच्या मूळ लक्षणांपासून फारकत घेत असल्याचंही अजब चित्र दक्षिण आफ्रिकेच्या वैद्यकीय परिषदेनं नोंदवलंय. फडफडून ताप येणं, नाकाला वास न येणं अशी सामान्य कोरोनामध्ये दिसून येणारी लक्षणंही दक्षिण आफ्रिकेतील रुग्णांमध्ये दिसून आलेली नसल्याचं दक्षिण आफ्रिकेच्या वैद्यकीय परिषदेच्या ए. कॉटझी यांनी सांगितलंय.
(हेही वाचा – देशभरात 21 ग्रीनफिल्ड विमानतळ उभारणार…)
कुठे किती आढळले रूग्ण
देशातील कर्नाटक राज्यातील ओमायक्रॉनच्या पहिल्या दोन केसेस या पूर्व आशियाई भागांतील पहिल्या केसेस ठरल्यात. रविवारपर्यंत देशात २३ ओमायक्रॉनच्या केसेस नोंदवल्या गेल्या. त्यापैकी १० केसेस महाराष्ट्रात सापडल्या आहेत. राजस्थानातील जयपूरमधील दक्षिण आफ्रिकेतील प्रवाशांसह संपर्कातील ९ जणांना कोरोनाची बाधा झालीय, त्यांचा ओमायक्रॉन तपासणीचा अहवाल पॉझिटीव्ह आलाय. शिवाय लुधियाना आणि केरळातूनही ओमायक्रॉन संशयितांच्या केसेस समोर येत आहेत.
ओमायक्रॉनवर मात करण्यासाठी लसीकरण आवश्यक?
कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचनांचं पालन केल्यास आपण कोरोना महामारीला निश्चितच टाळू शकतो. आपण डेल्टासारख्या घातक विषाणूचा यशस्वीरित्या सामना केलाय. देशांत उपलब्ध लसीकरणाचा चांगला परिणाम दिसून येत असल्यानंच कोरोनाबाधितांची संख्या कमी होत चाललीय. मात्र ओमायक्रॉनवर मात करण्यासाठी लसीकरणाची आवश्यकता आहे का, याबाबत जागतिक आरोग्य संघटनेलाच निर्णय घेऊ द्या, असे नेरूळ येथील डी व्हाय पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन मायक्रॉबायोलोजी विभागाचे प्रमुख डॉ अभय चौधरी यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community