नव्या नोकरीसाठी जुन्या नोकरीला ‘गुड बाय’ करणारे वाढले, रिपोर्टमध्ये खुलासा

161

देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याचे सांगण्यात येत असतानाच दुसरीकडे मात्र नोकरी सोडून जाण्याच्या प्रमाणात सुद्धा वाढ झाल्याचे दिसत आहे. एका रिपोर्टच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. देशातील 30 टक्क्यांहून अधिक कर्मचा-यांना त्यांची नोकरी बदलायची असल्याचे सांगण्यात येत असून, आपल्या कामाकडे कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने आपल्या करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी आणि आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पुढे जायला हवं, असं 70 टक्के लोकांचं म्हणणं असल्याचे या रिपोर्टच्या माध्यमातून स्पष्ट होत आहे.

मानसिकतेत बदल

PWC इंडियाकडून सादर करण्यात आलेल्या ग्लोबल वर्कफोर्स होप्स अँड फियर्स सर्व्हे 2022 या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत भारतात काम करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. त्यामुळे कंपनीचे मालक आणि काम करणा-या कर्मचा-यांच्या मानसिकतेत देखील मोलाचे बदल झाले आहेत, असे या अहवालात सांगण्यात आले आहे.

काय सांगतो अहवाल?

या सर्वेक्षणात देशभरातील 2 हजार 608 कर्मचारी सहभागी झाले होते. त्यापैकी 34 टक्के कर्मचा-यांचा कल हा नोकरी बदलण्याकडे आहे. जागतिक स्तरावर 19 टक्के कर्मचा-यांचे देखील हेच मत आहे. 1981 ते 1996 या काळात जन्मलेल्या कर्मचा-यांचा नवीन नोकरीसाठी शोध सुरू असून ते नोकरी बदलण्याची शक्यता सर्वाधिक आहे. असे 37 टक्के लोक पुढील वर्षात नोकरी बदलू शकतात, असा अंदाज या रिपोर्टच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. 1990 च्या दशकाच्या अखेरीस आणि 2010 च्या दशकाच्या सुरुवातीस जन्मलेल्या कर्मचा-यांचा नोकरी सोडण्याकडे फारसा कल नसल्याचेही यात सांगण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.