तुळसीच्या विवाहानंतर आता सर्वत्र लग्नाचा बार उडणार असला, तरी महागाईमुळे जेवणाच्या पंगतीचा खर्च वाढणार आहे. गेल्या दोन वर्षांत पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरसह खाद्यपदार्थांचे दर वाढल्याने आता कॅटरर्सनीदेखील ताटाची किंमत वाढवली आहे. त्यामुळे लग्नाचा खर्च काढताना पंगतीसाठी जास्तीचे बजेट आखावे लागणार आहे.
लग्नसराईची झाली सुरुवात
दिवाळी आणि तुळशी विवाह झाले की, लग्नाचे मुहूर्त सुरु होतात. विवाह सोहळ्यांचा धुमधडाका जुलैपर्यंत सुरु असतो. गेले दीड वर्ष कोरोना काळात 25 लोकांच्या उपस्थितीत लग्ने लावली जात होती, त्यामुळे लग्न थोडक्यात आणि कमी खर्चात होत होते. आता कोरोना स्थिती सुधारत असल्याने लग्नाची बडी मेजवानी देण्यासाठी अनेकांनी तयारी सुरु केली आहे.
दर अडीचशे रुपयांवर
स्वयंपाकाचा गॅस महागल्याने, तसेच अन्यधान्याचे भाव, खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने हॅाटेल आणि आहार आयोजक अर्थात कॅटरर्स यांनी जेवणाचे ताट महागण्याचे संकेत दिले आहेत. अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. याचा परिणाम लग्नसराईच्या काळात होण्याची शक्यता आहे. त्यातही लग्नाच्या पंगतीतील ताट महागण्याची चिन्हे आहेत. कोरोनाआधी साध्या ताटाला 160 ते 180 रुपये मोजावे लागत हाेते. आता ही किंमत वाढून 250 पर्यंत पोहोचली आहे.
( हेही वाचा :अबब…भारतातील ‘त्या’ नदीचे पाणी काचेप्रमाणे पारदर्शक )
Join Our WhatsApp Community