लग्नादरम्यान होणाऱ्या प्रत्येक विधीला एक विशिष्ट महत्त्व असतं. आज बदलत्या काळानुसार लग्नाशी संबंधित विधी आणि त्या पार पाडण्याच्या पद्धतींमध्येही काही नावीन्य आले आहे. आपल्या लग्नातील प्रत्येक क्षण खास असावा असे प्रत्येकाला वाटते. लग्नाआधीही हळद, मेहंदी, संगीत असे विधी होत असले, तरी सध्या विवाहपूर्व फोटोशूट जोडप्यांमध्ये खूप चर्चेत आहे. यासाठी तो कॅमेरामनपासून ते त्यांच्या कपड्यांपर्यंत आणि विशेषत: फोटोशूटची जागा सर्वोत्कृष्ट असावी, असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यासाठी प्रत्येक जोडप भन्नाट आणि इतरांपेक्षा वेगळं डेस्टिनेशन शोधत असतात. आता प्री वेडिंगसाठी थेट भंगारातलं विमान वापरण्यात येणार आहे.
फोटो स्टुडिओच्या मालकाने घेतले विमान
नुकताच धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील रस्त्यावर एक अजस्त्र ट्रक चाललेला पाहायला मिळाला. या ट्रकवर चक्क एक विमान होते. चेन्नई पोर्ट येथून हे विमान भंगारात खरेदी केले होते. सुरतच्या एका फोटो स्टुडिओच्या मालकाने हे विमान घेतलेले आहे. पाच दिवसाचा प्रवास करून हे विमान सूरतला पोहचेल, त्यानंतर त्याची रंगरंगोटी केली जाईल.
प्री-वेडिंगसाठी होणार उपयोग
रंगरंगोटी केलेले हे विमान प्री वेडींग शूटसाठी वापरले जाणार आहे. पायटलच्या पोझमध्ये बसलेला नवरदेव आणि त्याच्या शेजारी बसून त्याच्याकडे कौतुकाने पाहत असलेली त्याची होणारी बायको यांच्यासह या विमानाचे फोटो तुम्हाला पुढच्या काळात नक्की पहायला मिळणार आहेत.