राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २१ मार्च रोजी वाराणसीचे १२५ वर्षीय योगाचार्य स्वामी शिवानंद यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल सन्मानित झालेल्या स्वामी शिवानंद यांची नम्रता आणि साधेपणा पाहून राष्ट्रपती भवनात उपस्थित पाहुणेही थक्क झाले. पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी स्वामी शिवानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीन वेळा जमिनीवर नतमस्तक होऊन नमस्कार केला. ते पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खुर्चीवरून उठून स्वामी शिवानंदांना नमस्कार केला.
यांचाही पुरस्काराने सन्मान करण्यात आला
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी १२५ वर्षीय स्वामी शिवानंद यांच्यासह ५४ जणांना पद्मश्री पुरस्कार, दोन व्यक्तींना पद्मविभूषण, आठ जणांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान केले. देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या दोन्ही मुलींना राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला. गीता प्रेसचे अध्यक्ष राधेश्याम खेमका यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा मुलगा कृष्णकुमार खेमका यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
निरोगी राहण्यामागचे कारण
१२५ वर्षीय स्वामी शिवानंद यांना योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी हा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. योग आणि प्राणायामचा अवलंब केल्यास दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळू शकते, असे स्वामी शिवानंद यांचे मत आहे. पूर्वीचे लोक या जीवनशैलीचा अवलंब करून १०० वर्षांहून अधिक जगले. स्वामी शिवानंद यांचा जन्म ०८ ऑगस्ट १८९६ रोजी बांगलादेशातील सिलेट जिल्ह्यातील हरिपूर गावात झाला.
( हेही वाचा :आता रेल्वे प्रवासात जेवणाचे नो टेन्शन! २ एप्रिलपासून ही सुविधा सुरू )
दीर्घायुष्याचे रहस्य
योग, प्राणायाम आणि घरगुती उपचार हे निरोगी राहण्याची गुरुकिल्ली असल्याचे स्वामी शिवानंद यांचे मत आहे. त्याचा नियमित नित्यक्रमात समावेश केला पाहिजे. स्वामीजी रोज पहाटे तीन वाजता उठतात. स्नान करून दैनंदिन कामे केल्यावर ते भगवंताच्या भक्तीत लीन होतात.
Join Our WhatsApp Community