केवळ भारतातच नव्हे तर पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका या भारतीय उपखंडात पहिल्यांदाच राज्यात शरीरभर पांढरा आणि शेपटाने काळा रंग असलेला लुसिस्टीक खोकड सापडला होता. या खोकडातील शरीरात मॅलेनीनचे द्रव्य कमी असल्याने नाक, डोळे आणि शेपूट काळी आढळून आली होती. मात्र हा खोकड गेल्या आठवड्याच्या शेवटापासून दिसेनासा झाला आहे. सोलापूरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांनी त्याला संपवल्याची भीती वन्यजीव अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
श्वान कुळातील खोकड हा पश्चिम महाराष्ट्रातील उजाड माळरानावर दिसणारा हमखास प्राणी. गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यांत खोकडांची पिल्ले जन्माला येण्याच्या काळात वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन असोसिएशन या पर्यावरणप्रेमी संस्थेचे सदस्य डॉ. शिवानंद हिरेमठ यांना शरीरभर पांढ-या रंगाचा आणि शेपटी, नाक आणि डोळे काळ्या रंगाचा असलेला खोकड आढळला. या खोकडाला लुसिस्टिक खोकड असे नाव दिले गेले. याबाबत संशोधन केले असता केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडात पहिल्यांदाच लुसिस्टिक खोकड आढळल्याचे डॉ. हिरेमठ यांना आढळले. बेंगलुरु येथील डॉ. अजितप्रेमजी विद्यापीठात पर्यावरण विषयावर संशोधन करणारे साहाय्यक संशोधन राघवेंद्र वंझारी यांनीही याबाबतची माहिती गोळा करुन पहिल्यांदाच अशा पद्धतीचा लुसिस्टिक खोकड सापडल्याची खातरजमा डॉ. हिरेमठ यांना दिली. छोट्या आकाराचा आणि झुपकेदार शेपटीचा लुसिस्टीक खोकड याबाबत माहिती मिळाली असतानाच गेल्या चार दिवसांपासून दिसत नसल्याची माहिती सोलापूर वनविभाग (प्रादेशिक)चे विभागीय वनाधिकारी धैर्यशील पाटील यांनी दिली.
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढण्याचे कारण…
सोलापूरात सध्या कचरा व्यवस्थापनाची समस्या खोकडाच्या अस्तित्वासाठी आव्हानात्मक ठरली आहे. पार्टीत कुठेही फेकलेले मांस खाण्यासाठी भटकी कुत्री वाढली आहेत. ही भटकी कुत्री बिळात राहणा-या खोकडाला बाहेर काढून मारत आहेत. कित्येकदा चार-पाच महिने खोकडाच्या बिळांचे आम्ही संरक्षण केल्याचे डॉ. हिरेमठ सांगतात. खोकडाची शिकारही वाढली आहे. वणव्याचे प्रमाण लक्षात घेता लुसिस्टीक खोकडाच्या अस्तित्वाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. सोलापूरासारख्या उजाड माळरानावरील परिसरात आता बांधकामही वाढत आहे. स्वभावाने लाजाळू असलेला खोकड या अती मानवी हस्तक्षेपात जास्त टिकाव धरेल का, ही भीती डॉ. हिरेमठ यांनी व्यक्त केली. डिसेंबर महिन्यात जन्मलेला लुसिस्टिक खोकड आता पाच महिन्यांचा आहे. या काळात तो आईवडिलांसोबत फिरतही असतो. त्यामुळे एका ठिकाणी तो फारसा आढळत नाही. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लुसिस्टिक खोकडाबाबत कल्पना येईल, असेही डॉ. हिरेमठ म्हणाले.
Join Our WhatsApp Community