चंद्रपूरात विहीरीत वाघ पडल्याची घटना ताजीच असताना ताडोबा-अंधेरी व्याघ्र परिसराच्या बाहेरील शेतात गुरुवारी वाघीण मृतावस्थेत आढळली. नजीकच्या शेतात विजेच्या धक्क्याने ही वाघीण मृत्यू पावल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
वीजेच्या धक्क्याने वाघ मृत्यू पावल्याची ही विदर्भातील चौथी घटना असल्याची माहिती सातपुडा फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे यांनी दिली. वीजेच्या धक्क्याने वाघांच्या मृत्यूच्या घटनांमुळे वन्यप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण आहे.
(हे ही वाचा – ‘जाहीर माफी मागा, नाहीतर…’,अमृता फडणवीसांची मलिकांना कायदेशीर नोटीस)
मृत पावलेल्या वाघीणीचे वय अंदाजे अडीच वर्ष असल्याचा वनविभागाचा अंदाज आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच चंद्रपूर वनविभागातील भद्रावती भागांतील वनविभागाने तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. ही वाघीण गजेंद्र रणदिवे यांच्या शेतात मृतावस्थेत आढळली. या घटनेनंतर रणदिवे यांनी मात्र पलायन केले. रणदिवे यांचा शोध असल्याची माहिती वनविभागाने दिली. शेतमजूर निळकंठ दडमल यांना संशयित आरोपी म्हणून चौकशी केली जातेय. तर मृत वाघीणीचे शवविच्छेदन करुन अग्निदहन केल्याची माहिती वनअधिका-यांनी दिली.
Join Our WhatsApp Community