कोरोनासारख्या कठीण काळातून आता कुठे आपण बाहेर येत असलो तरीही आपल्यापैकी कित्येकांना आजही निद्रानाशाची समस्या भेडसावत आहे. निद्रानाश हा जीवनशैलीचाच आजार असल्याबाबतचे मत आता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होऊ लागले आहे. झोप येण्यासाठी मुळात पुरेसा सूर्यप्रकाश शरीराला मिळणे, आवश्यक असल्याचे वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी रुग्णालयाचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. प्रेयस वैद्य सांगतात.
माणसाच्या शरीराला सहा ते आठ तासांची झोप आवश्यक असते. मात्र कामाच्या गडबडीत ते शक्य होत नाही. पुरेशी झोप न मिळाल्याने शरीरात मुळात रोगप्रतिकारकशक्ती तयार होण्याच्या प्रक्रियेलाही बाधा पोहोचते. कर्करोग किंवा अल्झायमर, मधुमेहाच्या रुग्णांमध्ये आजार दुणावण्याचीही भीती असते. हृदय निकामी होण्याचीही भीती असते, अशी माहिती डॉ. वैद्य देतात.
(हेही वाचा – तुम्हाला शांत झोप लागतेय ना…? नसेल तर ही बातमी वाचा)
पुरेशी झोप येण्यासाठी
अधिक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळवणे आवश्यक. निद्रानाशाची समस्या असलेल्यांनी हा उपाय जरुर करावा. निद्रानाशेच्या समस्येपासून कायमची मुक्ती मिळवायची असेल तर दिवसा प्रखर सूर्यप्रकाशात मानवी शरीराच्या हालचाली होणे आवश्यक आहे. सूर्यप्रकाशात दिवसा शरीरातील उर्जेमध्ये वाढ होते. परिणामी, रात्री झोप लवकर येते. शिवाय पूरेशी झोपही लागते.
दुपारनंतर कॉफीचे सेवन टाळा
कॅफीन हा कॉफीतील घटक शरीरात आठ तास राहतो. कॉफीच्या सेवनाने थकलेले शरीरातील मज्जातंतू पुन्हा वेगाने कार्यरत होतात. परिणामी, झोप येण्यासाठी शरीर वेळेवर साथ देत नाही. दुपारी ३ नंतर कॉफीचे सेवन बंद केले तर रात्री वेळेवर झोप येण्यास मदत होईल.
स्क्रीन टाईम सांभाळा
सतत मोबाईल, संगणक किंवा टीव्हीवरील स्क्रीनसमोर राहणे हे निद्रानाशसाठी प्रमुख कारण ठरत आहे. झोपेची ठरलेली वेळ पाळण्यासाठी ९० मिनिटे अगोदर तुमचा स्क्रीन टाईम पूर्णपणे बंद करा
झोपण्यापूर्वी कोणत्याही द्रव पदार्थाचे सेवन टाळा
झोप लागल्यानंतर कित्येकदा लघुशंकेमुळे झोप मोडते. त्यामुळे रात्री उशिरा पाणी पिणे टाळणे पुरेशा झोपेसाठी सोयीस्कर ठरते
तज्ज्ञांचा सल्ला घ्या
कित्येकदा मानसिक आजारांत शरीराला झोप लागत नाही. शरीराची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी समुपदेशकांची सल्ला घेणे कधीही योग्य. शारिरीक तपासणी करुनही शरीरात दुखणे वाढत झोप मिळत नसेल तर डॉक्टर योग्य तो सल्ला देतील.
Join Our WhatsApp Community