आज चंद्र पृथ्वीच्या जवळ… 27 एप्रिलला ‘सुपर पिंकमून’चे होणार दर्शन!

चंद्र आणि पृथ्वीमधील ह्यावेळेस अंतर 3 लाख 58 हजार 615 किमी असेल, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी दिली.

27 एप्रिल रोजी अवकाशात एक विलोभनीय घटना आपल्याला पहायला मिळणार आहे. चैत्र पौर्णिमेची ही सुपरमून पौर्णिमा राहणार असून, वर्षातील पहिला सुपरमून असेल. ह्यावेळेस चंद्र 14% मोठा आणि 30% तेजस्वी दिसेल. ह्या सुपर मूनचे वैशिष्ट्य म्हणजे पौर्णिमा 27 तारखेला असली, तरी 26, 27 आणि 28 ह्या तीन दिवस चंद्र जवळजवळ पूर्ण दिसेल. चंद्र आणि पृथ्वीमधील ह्यावेळेस अंतर 3 लाख 58 हजार 615 किमी असेल, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी दिली.

काय आहे विशेष?

प्रत्येक वर्षी सुपरमूनच्या वेळेस चंद्र-पृथ्वी मधील अंतर कमी अधिक होत असते. हे कमीत-कमी अंतर 3 लाख 56 हजार 500 किमी., तर दूरचे अंतर 4 लाख 6 हजार 700 किमी. असते. ह्या वर्षीचे पृथ्वी-चंद्र सर्वाधिक कमी अंतर 26 मे 2021 रोजी होणाऱ्या सुपरमूनच्या वेळी राहणार आहे. 26 जानेवारी 1848 रोजी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आला होता, त्यानंतर नोव्हेंबर 2016ला चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ आला होता. 27 एप्रिल आणि 26 मे रोजी होणारे सुपरमून हे देखील खूप कमी अंतराचे राहील. पण पृथ्वी आणि चंद्रातील सर्वाधिक कमी अंतर हे 25 नोव्हेंबर 2035 रोजी असेल, तर 6 डिसेंबर 2052 रोजी शतकातील सर्वात मोठे सुपरमून होणार आहे. खऱ्या अर्थाने 27 एप्रिल आणि 26 मे 2021 हे दोन जुळे सुपरमून आहेत. दोन्ही वेळेसच्या चंद्र -पृथ्वी अंतरात केवळ 157 किमी. चा फरक आहे.

चंद्र दूर जातोय

चंद्र जेव्हा जवळ येतो तेव्हा चंद्राच्या गुरुत्वाकर्षानामुळे समुद्राला मोठी भरती येते. पृथ्वीवर सजीवांची निर्मिती होण्यासाठी भरती-ओहोटीचे खूप महत्व आहे. पण आपल्यासोबत सतत राहणारा, प्रेमाचे प्रतिक आणि धार्मिक महत्वाचा हा चांदोमामा हळूहळू पृथ्वीपासून दूर जात आहे आणि भविष्यात हजारो वर्षांनी चंद्र खूप दूर जाईल आणि पृथ्वीवर ग्रहणे होणार नाहीत, भरतीचे चक्र राहणार नाही.

काय आहेत वेगळी नावे

चंद्र स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती 27,3 दिवसात प्रदक्षिणा करतो. मात्र, चंद्राच्या लंबवर्तुळाकार प्रदक्षिणेमुळे पौर्णिमा ते पौर्णिमा हा महिना 29,5 दिवसाचा असतो. पाश्चात्य लोकांनी ह्या पौर्णिमेला पिंक मून म्हणून संबोधले असले, तरी त्याचा रंगाशी काहीही संबंध नाही. ग्रास मून, एग मून, फिश मून आणि पाश्चल मून म्हणून ओळखला जातो. भारतीय कॅलेंडर नुसार ही चैत्र पौर्णिमा असून, ह्या दिवशी हनुमान जयंती आहे. गौतम बुद्धाने ह्याच दिवशी श्रीलंकेला भेट दिली होती, त्यामुळे तिथे ह्या पौर्णिमेला ‘बक पोसा’ असे म्हटले जाते.

कसा बघाल सुपरमून?

सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगवताना मोठ्या आकाराचा दिसेल. पौर्णिमेला तो तूळ राशीत असेल, सुपरमून पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही. पण दुर्बिणीला फिल्टर लावून, त्यावरील विवर पाहू शकतो. ह्यावेळेस चंद्र आकाराने मोठा आणि खूप तेजस्वी दिसणार असल्याने, ह्या खगोलीय घटनेचा खूप आनंद घ्यावा. सध्या कोरोना संकट आणि संचारबंदी असल्याने आपण घरुनच सुपरमून पहावा, असे आवाहन स्काय वॉच ग्रुपतर्फे प्रा. सुरेश चोपणे ह्यांनी केले आहे..

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here