महाराष्ट्रात हिवाळी पर्यटनासाठी टॉप ५ डेस्टिनेशन्स !

ऑक्टोबर ते फेब्रुवारी या गुलाबी थंडीच्या काळात अनेक उत्साही लोक पर्यटनाला प्राधान्य देतात. महाबळेश्वर, माथेरान, अलिबाग या भागात तर, पर्यटकांची मांदियाळी असते. पण, या महत्वपूर्ण ठिकाणांशिवाय महाराष्ट्रात इतरही जागा आहेत ज्या, अलिकडच्या वर्षात लध वेधक ठरत आहेत. महाराष्ट्रातील अशा हटके टॉप ५ ठिकाणांविषयी माहिती जाणून घेऊया.

१. कास पठार

साताऱ्याजवळ असलेले कास पठार हे फुलझाडे आणि फुलपाखरांच्या विविध प्रकारांसाठी प्रसिद्ध आहे. ऑक्टोबर महिना आला की, कास पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरून जाते. पठारामध्ये फुलांच्या २८० प्रजाती व वेली, झुडुपे आणि इतर जातींच्या ८५० प्रजाती आहेत. या पठाराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी दिवसभरात ३ हजार पर्यटकच हे पठार पाहू शकतात. अशी मर्यादा घालण्यात आली आहे. साताऱ्यापासून २५ किलोमीटर अंतरावर हे पठार स्थित आहे. भारताच्या पश्चिम घाटाचा एक भाग असल्याने, कास पठार युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये गणला जातो. कोरोनाच्या निर्बंधांनंतर ऑगस्ट महिन्यात कास पठार पुन्हा पर्यटनासाठी खुले करण्यात आले आहे.

कास पठार पाहण्यासाठी पर्यटकांना www.kas.ind.in या वेबसाइटवर आगावू प्रवेश शुल्क भरून अगोदरच बुकिंग करावं लागणार आहे. यासाठी प्रतिव्यक्ती शंभर रुपये शुल्क आकारला जात आहे.

२. अजिंठा-वेरूळ लेणी

जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा वेरूळ लेण्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. अजिंठा वेरूळ लेण्या पाहण्यासाठी परदेशातून अनेक नागरिक येथे येतात. भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील १२ पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळच्या लेण्यांचा या यादीत समावेश आहे.
– वेरूळ (एलोरा लेणी)
सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. वेरूळच्या ३४ लेण्यांची हिंदू, बौद्ध व जैन अशी विभागणी झाली आहे. लेण्यांमधील १ ते १२ क्रमांकांची लेणी बौद्ध, १३ ते २९ हिंदू आणि ३० ते ३४ जैन आणि १६ वी लेणी ही विख्यात कैलास लेणे आहे.
– अजिंठा लेणी
अजिंठाच्या पहिल्या प्रवेशद्वाराबाहेर खाजगी वाहनाची पार्किंग करावी लागते आणि तेथून सरकारी बसने आत मध्ये प्रवेश केला. या ठिकाणी अद्भुत शिल्पकृती,स्थापत्यशास्त्राच्या ३० लेण्या पाहावयास मिळतात.

३. कळसूबाई शिखर (नाईट ट्रेक)

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची उंची अंदाजे ९०० मीटर आहे. ज्यांना शिखर सर करणे शक्य नाही, अशा लोकांना सोयीचे म्हणून पायथ्याशी कळसूबाईचे नवे मंदिर बांधण्यात आले आहे. शिखरावर जाण्यासाठी ३ ते ४ तासाचा ट्रेक करत जावे लागते. अलिकडच्या तरूणाईमध्ये ट्रेकिंगचे आकर्षण वाढत असताना कळसूबाई शिखरावर नाईट ट्रेक करण्यात येत आहे. रात्री १ ते २ च्या सुमारास शिखर चढायला सुरूवात करून, पहाटे महाराष्ट्राच्या सर्वोच्च कड्यावरून सुर्योदयाचा आनंद घेण्यात नेत्रदिपक सुख मिळते.

कळसूबाई शिखर विशेषत: नाईट ट्रेकचे आयोजन विविध संघांकडून केले जाते. या सहलीसाठी साधारण १ हजार ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत प्रत्येकी खर्च येईल.

( हेही वाचा : देशातील ‘हे’ शहर होणार शुध्द शाकाहारी! )

४. ताडोबा अभयारण्य

ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात असून, या अभयारण्यात विपुल प्रमाणात वन्यजीवांचे दर्शन करता येते. ताडोबा अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात जुने व मोठे अभयारण्य आहे. हे अभयारण्य ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते. या अभयारण्यात व्याघ्र दर्शन करण्यासाठी पर्यटक आवर्जून हजेरी लावतात. जीप सफारीमधून तुम्ही संपूर्ण अभयारण्याचे दर्शन घेऊ शकतो. ताडोबा अभयारण्याची सफारी बुक करण्यासाठी सध्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही. चंद्रपूरच्या जिल्हा वन अधिकारी कार्यालयात आपण कमीत कमी ६० दिवस अगोदर सफारी बुक करू शकतो.

सफारीच्या वेळा :
सकाळी ६.०० ते सकाळी १०.००
दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.००

५. मालवण

गेल्या काही वर्षापासून कोकण पर्यटनाला चालना मिळत आहे. ऑक्टोबरपासून मालवणचे किनारे बहरतात. पर्यटकांसाठी तारकर्ली, देवबाग यांसारखे समुद्रकिनारे खास आकर्षण ठरतात. मालवण किल्ला, तारकर्ली, गणेश मंदिर, देवबाग पर्यटन स्थळांसोबतच तुम्ही स्कूबा डायव्हिंगच्या माध्यमातून समुद्रखालचे विश्व अनुभवता येईल. पॅरासेलिंग, बनाना राई़ड, बंपर राईड यांसारख्या समुद्रीखेळ तरूणाईचे लक्ष वेधून घेतात. कोकण किनारपट्टीच्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय मालवण सहलीला पूर्णत्व येणार नाही. मालवणी खाद्यपदार्थ म्हणजेच खाजं, शेंगदाणा लाडू, शेवाचे लाडू (खटखटे लाडू), कुळथाचं पीठ, मालवणी मसाले, कोलंबीचं लोणचं, काजू आणि त्याचे विविध पदार्थ, फणसपोळी, आंब्याचे विविध पदार्थ याठिकाणी सहज उपलब्ध होतात.

( हेही वाचा : मोबाईलवर वेळ घालवण्यात भारताचा क्रमांक कितवा? )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here