देशात ट्रेनचा प्रवास हा सर्वात सोयीस्कर प्रवास समजला जातो. दररोज जवळपास अडीच कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ट्रेनला कायम पहिली पसंती असते. कारण रेल्वे प्रवासाचे भाडेदर हे विमान, बस प्रवासापेक्षा कमी असते आणि देशातील गावांपर्यंत रेल्वेसेवा जोडली गेली आहे. ट्रेनमधून प्रवास करताना तुम्हालाही अतिरिक्त सामान घेऊन जाण्याची सवय असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. परंतु रेल्वे सुद्धा प्रवाशांना त्यांच्यासोबत मर्यादित सामान घेऊन जाण्याची परवानगी देते.
( हेही वाचा : कोकण रेल्वेत नोकरीची संधी! परीक्षेविना होणार निवड, येथे करा अर्ज)
रेल्वेच्या नियमांनुसार प्रवाशांना डब्यात एका ठराविक मर्यादेपलीकडे सामान नेता येत नाही. याशिवाय तुम्हाला दुचाकी किंवा सायकल घेऊन जाण्यासाठी विशेष परवानगीची आवश्यकता असते. प्रवाशांना अतिरिक्त सामाना घेऊन प्रवास करायचा असेल, तर रेल्वे सामान सेवेचा वापर करावा किंवा लगेज व्हॅनमध्ये सामान बुक करावे असा सल्ला देते.
रेल्वे प्रवासादरम्यान अतिरिक्त लगेजसाठी कुठे बुकिंग कराल?
रेल्वे तिकीट बुक करताना सामानासाठी सुद्धा विशेष तिकीट बुक करता येते. याशिवाय तुम्ही रेल्वे स्टेशनवर असलेल्या पार्सल ऑफिसमधून सुद्धा अतिरिक्त लगेचसाठी बुकिंग करू शकता. यासाठी किमान ३० रुपये भरावे लागतात. वस्तूंच्या बुकिंगवर मालाच्या वजनानुसार तुम्हाला पैसे भरावे लागतील. लगेज व्हॅनमध्ये सामान ठेवण्यासाठी तुम्हाला गाडी सुटण्यापूर्वी ३० मिनिटे आधी सामान घेऊन रेल्वे स्थानकाच्या पार्सल कार्यालयात जावे लागणार आहे. याठिकाणी तुमच्या सर्व सामानाचे मोजमाप करण्यात येईल. तुमचे सामान १०० किलोपेक्षा जास्त असेल तर त्यावर अधिभार लागू केला जाईल. बुकिंगसाठी तुमचे सामान चांगले पॅकिंग करणे आवश्यक आहे. नियमानुसार तुम्ही ७० किलो वजनापर्यंतचे सामान ट्रेनमधून घेऊन जाऊ शकता.
प्रवाशांनो अतिरिक्त सामान घेऊन जाताना या गोष्टी लक्षात ठेवा…
- प्रवासी ४० ते ७० किलो पर्यंत सामान ट्रेनमधून स्वत:सोबत घेऊन जाऊ शकतात.
- स्लीपर क्लासमध्ये ४० किलोपेक्षा जास्त वजन नेता येणार नाही.
- एसी २ टियमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजन घेऊन जाण्याची परवानगी नाही.
- फर्स्ट क्लास ( 1 AC) मधून तुम्ही ७० किलो सामान घेऊन जाऊ शकता.
- यापेक्षा जास्त सामान तुम्ही सोबत घेऊन जात असाल तर रेल्वेकडून तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो.
- उदा. एखादा प्रवासी ४० किलोपेक्षा अतिरिक्त सामान घेऊन ५०० किमीचा प्रवास करत असेल तर प्रवासी १०९ रुपये देऊन सामान लगेज व्हॅनमध्ये ठेवू शकतात. प्रवासादरम्यान अतिरिक्त सामानासह पकडल्यास ६५४ रुपये दंड भरावा लागणार आहे.
- ट्रेनमधून आक्षेपार्ह वस्तू, स्फोटके, धोकादायक ज्वलनशील वस्तू, रिकामे गॅस सिलिंडर, मृत कोंबड्या इत्यादी प्रकारच्या वस्तू किंवा सामान घेऊन जाण्यास पूर्णपणे बंदी आहे. प्रतिबंधित वस्तू घेऊन जाताना आढळल्यास रेल्वेकडून कलम १६४ अन्वये कारवाई करण्यात येईल.