पर्यटन आणि फिरण्याची आवड असलेल्यांसाठी रेल्वेने एक मोठी संधी दिली आहे. भारतीय रेल्वे 21 जूनपासून भारत गौरव टुरिस्ट ट्रेन सुरू करत असून ही ट्रेन केवळ रामायण यात्रेसाठी चालवली जाणार आहे. IRCTC ची ही टुरिस्ट ट्रेन प्रभू श्री रामाशी संबंधित ठिकाणांना भेट देणार आहे. श्री रामायण यात्रेचे हे टूर पॅकेज 17 दिवस आणि 18 रात्रीचे असणार आहे. IRCTC च्या स्वस्तात असणाऱ्या या टूर पॅकेजबद्दल वाचा सविस्तर…
या ठिकाणांना भेट देता येणार
या 18 दिवसांच्या यात्रेतील पहिला मुक्काम श्री रामजन्मभूमी अयोध्या असणार आहे. यानंतर बक्सर येथील विश्वामित्र आश्रम आणि रामरेखा घाट येथे गंगास्नान असेल. यानंतर ही स्पेशल ट्रेन सीतामढीला पोहोचेल, त्यानंतर अखेरीस माता सीतेचे जन्मस्थान जनकपूर हे प्रवाशांना पाहता येणार आहे. या स्पेशल ट्रेनचा पुढचा मुक्काम भगवान महादेवाची नगरी काशी असेल. जेथे पर्यटक प्रयाग, शृंगवरपूर आणि चित्रकूट येथील मंदिरांसह धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतील. काशी, प्रयागराज आणि चित्रकूटमध्ये रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था रेल्वेकडून करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
चित्रकूटनंतर ही ट्रेन भाविकांना थेट नाशिकच्या पंचवटी आणि त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी घेऊन जाईल. नाशिकनंतर हंपी या प्राचीन किष्किंधा शहरात भाविकांना दर्शन दिले जाणार आहे. येथे प्रवाशांना अंजनी पर्वतातील हनुमानाचे जन्मस्थान पाहता येणार आहे. हंपीहून रामेश्वरमला पोहोचल्यावर प्रवाशांना शिव मंदिर आणि धनुषकोडी पाहण्याची संधी मिळेल. या ट्रेनचा शेवट तेलंगणातील भद्राचलम येथे असेल तर ही विशेष ट्रेन सुमारे 8000 किमीचा प्रवास पूर्ण करून 18 व्या दिवशी दिल्लीला परणार आहे.
पॅकेजची किंमत किती असणार?
आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या ट्रेनला एसी डबे असतील. यामध्ये पर्यटकांना फक्त शुद्ध शाकाहारी जेवण दिले जाईल. 18 दिवसांच्या या प्रवासासाठी तुम्हाला एकूण 62,370 रुपये मोजावे लागतील. विशेष म्हणजे हे पॅकेज तुम्ही हप्त्यांवर देखील घेऊ शकतात असे रेल्वेकडून सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community