गुगलवर डेटा अपलोड करायला आता भरावे लागणार पैसे! किती? वाचा…

1 जून 2021 पासून गुगलद्वारे देण्यात येणा-या सेवांमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. काय आहेत ते बदल?

सध्याच्या या टेक्नोसॅव्ही युगात पदोपदी आपल्याला ज्याची मदत होते, ते म्हणजे गुगल. कुठल्याही विषयाची माहिती देण्यापासून, आपल्या मोबाईलच्या कॅमे-यातून कैद झालेल्या आठवणींचा डेटा गुगलकडे आहे. पण आता जर तुम्हाला गुगलवर ठराविक मर्यादेच्या पलिकडे डेटा स्टोअर करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागू शकतात. 1 जून 2021 पासून गुगलद्वारे देण्यात येणा-या सेवांमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. काय आहेत ते बदल जाणून घेऊया…

इतकी मिळणार स्टोरेज स्पेस

गुगलवर फोटो, व्हिडिओ, इमेल यांसारखा डेटा स्टोअर करण्याची सुविधा देण्यात येते. पण आता हाच डेटा साठवण्यावर गुगलकडून काही बंधने घालण्यात आली आहेत. 1 जूनपासून आता युजर्सना गुगलवर अनलिमिटेड डेटा अपलोड करण्याची सुविधा मिळणार नाही. प्रत्येक जीमेल युजरला 1 जूनपासून 15 जीबी डेटा स्टोअर करण्याइतकी स्पेस देण्यात येईल. यामध्ये गुगल ड्राईव्हवर सेव्ह केले जाणारे, फोटो, व्हिडिओ आणि इतर डेटा, तसेच इमेल्सचा समावेश असेल.

इतके मोजावे लागणार पैसे

एकदा का ही 15 जीबीची स्पेस संपली, की त्यापुढे डेटा स्टोअर करण्यासाठी तुमच्या खिशाला कात्री लागू शकते. कारण 15 जीबीच्या वर डेटा स्टोअर करण्यासाठी 1 जूनपासून गुगल वन सबस्क्रिप्शन घेणे गरजेचे आहे. हे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला महिन्याला 130 रुपये किंवा वर्षाला 1300 रुपये मोजावे लागू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 1 जून 2021च्या नंतरच्या डेटासाठी ही 15 जीबीची अपलोड लिमीट असणार आहे. त्याआधी अपलोड असलेल्या डेटा त्यात गणला जाणार नाही.

(हेही वाचाः ‘ऑनलाईन’ व्यवहार करताना ‘फसवणूक’ कशी टाळाल? वाचा सविस्तर माहिती)

हा डेटा होतो गुगलवर अपलोड

  • गुगल फोटो- ओरिजिनल क्वालिटी फोटो आणि व्हिडिओ.(हाय क्वालिटी डेटा असल्याने स्टोरेज स्पेस सुद्धा जास्त लागते.)
  • जीमेल- जीमेल मेसेजेस आणि मेलद्वारे येणारा डेटा.(स्पॅम आणि ट्रॅश फोल्डर धरुन)
  • गुगल ड्राईव्ह- पीडीएफ फाईल, एमेजेस, व्हिडिओ.

15 जीबी स्पेस संपल्यावर काय होणार?

  • गुगल ड्राईव्हवर इमेज किंवा नवीन फाईल अपलोड करता येणार नाही.
  • ओरिजिनल क्वालिटी फोटो आणि व्हिडिओचा बॅकअप घेता येणार नाही.
  • इमेलवर येणा-या मेसेज सुविधेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो.

युट्यूबवर कमाई करताय? मग भरा कर

सध्या युट्यूबर्स हे खूप फॉर्ममध्ये आले आहेत. लॉकडाऊनने तर अशा अनेक नव्या युट्यूबर्सना जन्म दिला आहे. युट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड करुन पैसे कमावणं, हा सध्या सोपा मार्ग झाला आहे. पण अशी कमाई करणा-या युट्यूबर्सना आता त्या कमाईसाठी कर भरावा लागणार आहे. अमेरिकेच्या बाहेर युट्यूब क्रिएटर्सकडून करवसुली करण्याचा निर्णय आता गुगलने घेतला आहे. अमेरिकेतून व्हिडिओला आलेल्या व्ह्यूजसाठी आता युट्यूबर्सना 1 जूनपासून कर भरावा लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here