पालघर जिल्ह्यातील जव्हारला मिनी महाबळेश्वर समजले जाते. पावसाळा सुरू झाला अनेकजण फिरण्याचे प्लॅन करतात लोणावळा, माळशेज या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते. परंतु मुंबईजवळ असणाऱ्या जव्हार भागात निसर्गाच्या कुशीत वसलेले धबधबे सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. मुंबईजवळ जव्हार हे महाराष्ट्रातील पावसाळ्यात भेट देण्यासाठी उत्तम ठिकाणांपैकी एक आहे. जय विलास पॅलेस, सनसेट पॉइंट, शिर्पामाळ, हनुमान पॉइंट तसेच जव्हारमधील विविध धबधब्यांना वन डे ट्रीपचा प्लॅन करून तुम्ही या पावसाळ्यात नक्की भेट द्या.
( हेही वाचा : Budget Trip : पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर आणि हटके जागा! )
दाभोसा आणि दादरकोपरा धबधबा
जव्हारपासून १८ किलोमीटरवर तलासरी-सिलव्हासा मार्गावर सुंदर धबधबे आहेत. दाभोसा हा येथील मुख्य धबधबा असून याची उंची ३०० फूट इतकी आहे. दादरकोपरा धबधबा हा उन्हाळ्यात कोरडा असतो म्हणून याला सुका धबधबा असेही म्हणतात. दोन्ही धबधबे हे उंच डोंगरांनी वेढलेले आहेत. या भागात तुम्हाला अनेक औषधी वनस्पती आढळून येतील.
जयविलास राजवाडा
जव्हारमधील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू असलेला हा वाडा राजबरी या नावाने सुद्धा ओळखला जातो. शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हा वाडा डोंगराच्या माथ्यावर बांधला गेला आहे. आदिवासी संस्कृती दर्शवणारे कोरीवकाम, राजवाड्याची घुमटे आणि याबाजूचा हिरवागार निसर्ग ही या राजवाड्याची वैशिष्ट्ये आहेत. गुलाबी दगडातून तयार केलेल्या या वास्तुरचनेमुळे या वाड्याचा वापर अनेक चित्रपटांच्या चित्रकरणासाठी सुद्धा केला जातो.
सनसेट पॉईंट
सनसेट पॉईंट हे जव्हारमधील प्रसिद्ध ठिकाण आहे. येथून तुम्हाला सूर्यास्ताचे दर्शन घडेल. शहराच्या मध्यवर्ती भागापासून फक्त अर्धा किमीवर हे ठिकाण आहे. येथून दरीचा आकार धनुष्यासारखा दिसतो म्हणून पूर्वी या भागाला धनुकमळ असे म्हटले जायचे.
काळमांडवी धबधबा
जव्हार शहरापासून हा धबधबा ५ किमी अंतरावर आहे. केळीचा पाडा या गावातून ३ किमी अंतरावर आत गेल्यावर तुम्हाला काळमांडवी धबधब्याचे दर्शन घडेल. काळशेती या नदीवरून हा धबधबा पडत असल्याने या धबधब्याचे नाव काळमांडवी असे पडले आहे.
Join Our WhatsApp Community