-
ऋजुता लुकतुके
१८ व्या वर्षी पहिल्यांदा ग्रँडमास्टर झालेला आणि नंतर ५ जगज्जतेपदं जिंकलेला विश्वनाथन आनंद (Viswanathan Anand) फारसा प्रकाशझोतात नसतोच. पण, अलीकडे डी गुकेशने आनंद मागोमाग जगज्जेतेपद जिंकलं. तर अर्जुन एरिगसी आनंद नंतर पहिला २८०० एलो रेटिंग गुण पार करणारा भारतीय ठरला आणि त्यानंतर बातमी समोर आली की, भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या सांगण्यावरून हे तिघेच नाहीत तर भारतातीय इतरही युवा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदकडूनच मार्गदर्शन घेत होते. २०२३ पासून आनंदचं या युवा खेळाडूंवर लक्ष आहे आणि भारत ऑलिम्पियाडमध्ये पदक मिळवेल हे भाकीत आनंदने युवा गुणवत्ता हेरून आधीच केलं होतं. ते भाकीत २०२४ मध्ये खरं साबीत झालं. पुरुष आणि महिला संघानेही बुद्धिबळातील प्रतीष्ठेचं सांघिक विजेतेपद म्हणजेच ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण जिंकलं.
असा हा आनंद (Viswanathan Anand) जागतिक बुद्धिबळ संघटनेत खेळाडूंच्या संघटनेचा उपाध्यक्षही आहे. म्हणजे मितभाषी असला तरी लाडक्या बुद्धिबळ क्षेत्रात तो सक्रिय आहे आणि सोशल मीडियावर तो कधी भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसतो. तर कधी कधी त्यांची मस्करीही करतो. १९८८ मध्ये विश्वनाथन आनंदने ग्रँडमास्टर हा किताब पहिल्यांदा पटकावला आणि त्यानंतर भारतीय बुद्धिबळाचा चेहरामोहराच बदलून गेला. जागतिक स्तरावर भारताचं नाव झालं आणि देशात बुद्धिबळाला लोकप्रियता मिळाली. पुढे जाऊन बुद्धिबळ जगज्जेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला आणि एकूण पाचवेळा त्याने हे पद जिंकलं. तर जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावणाराही तो पहिलाच भारतीय. त्यानंतर तशी कामगिरी अजून तरी कुणी केलेली नाही.
(हेही वाचा – I.N.D.I. Alliance : काँग्रेस-तृणमूलमध्ये दुरावा वाढणार)
आनंद (Viswanathan Anand) सध्या युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यामागे गुंतला आहे. पण, त्याला बुद्धिबळाची पहिली ओळख कुणी करून दिली ठाऊक आहे? आनंदची आई तो पाच वर्षांचा असल्यापासून धरीच त्याच्याशी बुद्धिबळ खेळायची. तिथून त्याने शालेय स्तरावरील राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा खेळायला सुरुवात केली आणि त्याच्यातील कौशल्य लक्षात आल्यावर आईने त्याला बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे. १५ व्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय मास्टर झालेला होता आणि १८ व्या वर्षी देशाचा पहिला ग्रँडमास्टर होत त्याने इतिहास रचला.
त्याचा खेळाचा वेग इतका विलक्षण होता की, रॅपिड बुद्धिबळात तो तेव्हाचा जगज्जेता गॅरी कॅस्परोव्हलाही मात देऊ शकत होता. म्हणूनच त्याला ‘लायटनिंग किड’ म्हणजे वीज म्हणायचे. पाचवेळा त्याने बुद्धिबळ जगज्जेतेपद पटकावलं आणि तीन दशकं जागतिक बुद्धिबळावर आपला ठसा उमटवला. २००७ साली त्याला देशातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलं. २०१३ मध्ये मॅग्नस कार्लसनने त्याचं जगज्जेतेपद कायमचं हिरावून घेतलं. त्यानंतर आनंदला (Viswanathan Anand) ते पुन्हा जिंकता आलं नाही. सौम्य बोली आणि हसतमुख चेहरा यामुळे शारीरिक मर्दुमकीचा खेळ नसतानाही आनंद भारतात लोकप्रिय झाला. बुद्धिबळातील कसब आणि विविध स्पर्धांमध्ये तसंच जाहिरातींमधून कमावलेली मिळकत याच्या जोरावर आतापर्यंत त्याने ५० लाख अमेरिकन डॉलरची कमाई केली आहे. सेलिब्रिटी नेटवर्क वेबसाईटने हा आकडा दिला आहे. भारतात बुद्धिबळ लोकप्रिय करण्यात आनंदचा मोठा वाटा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community