पेट्रोल, डिझेलचे दर एका बाजूला सातत्याने वाढत असल्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. त्यामुळे या रोजच्या कटकटीतून थोडासा विरंगुळा म्हणून सर्वसामान्य टिव्ही पाहून आपली करमणूक करुन घेत असतात. अर्थात टिव्हीवरच्या मालिका पाहून या कटकटींमध्ये अधिक भर पडत असेल, पण शेवटी एक मनोरंजन म्हणून तोच एक पर्याय असल्यामुळे त्याचा सर्वांनाच आधार असतो. पण आता टिव्ही चॅनेल्सचे दर सुद्धा वाढणार असल्याने तो बंद करुन ठेवण्याचीच वेळ आली आहे. त्यामुळे टिव्हीवरचं मनोरंजन तुमच्या डोळ्यात चांगलंच अंजन घालणार आहे.
एवढे मोजावे लागणार पैसे
स्टार प्लस, झी टीव्ही, सोनी यांसारखे काही लोकप्रिय चॅनेल्स आणि काही प्रादेशिक चॅनेल पाहण्यासाठी दर्शकांना 35 ते 50 टक्के अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. स्टार आणि डिस्ने इंडिया चॅनेल पाहण्यासाठी आता लोकांना 49 रुपयांऐवजी 69 रुपये मोजावे लागणार आहेत. सोनीसाठी दरमहा 39 रुपयांऐवजी 71 रुपये, तर झीसाठी 39 रुपयांऐवजी दरमहा 49 रुपये आणि वायाकॉम 18 चॅनेलसाठी दरमहा 25 रुपये ऐवजी 39 रुपये मोजावे लागणार आहेत.
(हेही वाचाः फॉरेन टूरचा विचार करताय? मग वाचा कोणत्या देशांमध्ये कसे आहेत नवे नियम)
हे आहे कारण
देशातील प्रमुख ब्रॉडकास्टिंग नेटवर्क्स झी, स्टार, सोनी आणि Viacom18 ने काही चॅनल्स आपल्या प्लॅनमधून बाहेर काढली आहेत. त्यामुळे टीव्ही पाहणाऱ्या ग्राहकांना 50 टक्क्यांपर्यंत अधिक खर्च करावा लागू शकतो. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या नवीन दर आदेशाच्या अंमलबजावणीमुळे या किंमती वाढत आहेत. ब्रॉडकास्टिंग नेटवर्कच्या प्लॅनमध्ये ऑफर केलेल्या चॅनेलचे मासिक मूल्य 15-25 रुपयांच्या दरम्यान ठेवले गेले. परंतु ट्रायच्या नवीन दर आदेशात हे किमान 12 रुपये निश्चित करण्यात आले. अशा स्थितीत बहुतेक चॅनेल फक्त 12 रुपयांमध्ये देऊ करणे खूप खर्चिक ठरू शकते. हे नुकसान कमी करण्यासाठी नेटवर्कने काही लोकप्रिय वाहिन्या बुकमधून काढून त्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला.
नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) जारी
मार्च 2017 मध्ये TRAI ने टिव्ही चॅनेल्सच्या किमतींबाबत नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) जारी केली होती. त्यानंतर 1 जानेवारी 2020 रोजी NTO 2.0 जारी झाला. यामुळे सर्व नेटवर्क NTO 2.0 नुसार त्यांच्या चॅनेलच्या किंमती बदलत आहेत.
(हेही वाचाः १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण! देशभर ‘असे’ होतेय सेलिब्रेशन!)
Join Our WhatsApp Community