5G स्पेक्ट्रमचा लिलाव पुढील वर्षी एप्रिल-मेच्या आसपास होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले. दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या सुधारणांचा पहिला टप्पा या वर्षी सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या मदतीच्या उपाययोजनांशी सुसंगत आहे आणि सरकार आणखी सुधारणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतात 2G ते 5G चा प्रवास कालावधी अवघ्या 10 वर्षात पूर्ण होणार आहे. भारतात सध्या 4G सेवा उपलब्ध आहे आणि लवकरच 5G सेवा देखील उपलब्ध होणार असल्याची घोषणा अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. त्यांच्या मते, 5G सेवा कराराचा लिलाव करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, असे एका वृत्तवाहिनीशी बोलताना वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.
(हेही वाचा -‘एसटी’चा संप मोडून काढण्यासाठी शिवसेनेचा ‘बेस्ट’ मार्ग)
लवकरच प्रक्रिया होणार सुरू
अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात 5G सेवा देण्यासाठीची लिलाव प्रक्रिया पुढील 6 महिन्यांत म्हणजेच पुढील वर्षी एप्रिल-मेपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले की, “या लिलाव प्रक्रियेसाठीचे नियम आणि इतर बाबी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ठरवेल. पुढील वर्षी मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर लवकरच 5G साठी लिलाव प्रक्रिया सुरू केली जाईल. ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या जागतिक दर्जाच्या मानकांची पूर्तता करते यावर आम्ही भर देत आहोत. त्यामुळे लवकरच आम्ही हा लिलाव करू.”
होणार मोठे बदल
येत्या २ ते ३ वर्षांत जगात मोठे बदल होण्याचे संकेत दूरसंचार मंत्र्यांनी दिले. त्यांनी असे सांगितले, “पुढील दोन ते तीन वर्षांत टेलिकॉम जगताचे नियम पूर्णपणे बदलतील आणि ते जागतिक मानकांनुसार असतील.” दूरसंचार क्षेत्राकडे पाहण्याचा केंद्र सरकारचा दृष्टिकोन पूर्णतः बदलला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतात जागतिक दर्जाच्या दूरसंचार प्रणालीचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल.
Join Our WhatsApp Community