ओमिक्रॉनमुळे पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? वाचा सविस्तर…

कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनने जगभरात धुमाकूळ घातला आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या रूग्णांमध्ये या ओमिक्रॉनचा संसर्ग आढळून आला. त्यानंतर या व्हायरसने भारतातही शिरकाव केला. सध्या देशात ओमिक्रॉनबाधित रूग्ण आढळल्याने देशाची चिंता वाढली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोनाने देशाला विळखा घातला होता. त्यामुळे त्याचा फटका जागतिक बाजारपेठेला देखील बसला होता. दरम्यान, कोरोनातून सावरत असलेल्या जागतिक बाजारपेठेला आता ओमिक्रॉनच्या भीतीने ग्रासले आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू लागल्याने जागतिक बाजारपेठ आक्रसत चालल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे तेलाचे भावही कमी कमी होत चालले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटत असल्याने देशांतर्गत किमतीही कमी होण्याचे संकेत आहे. परिणामी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अशी आहे सध्या कच्च्या तेलची किंमत

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कच्च्या तेलाची किंमत ८४ डॉलर प्रति बॅरल एवढी होती. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कच्चे तेल अवघे ४३ डॉलर प्रति बॅरल असे होते. ओमिक्रॉन व्हेरियंटनंतर गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाची किंमत ७० डॉलर प्रति बॅरल एवढी खाली घसरली आहे.

(हेही वाचा- राज्य सरकारला धक्का! ओबीसी आरक्षणावरील स्थगिती कायम, अध्यादेशावरही आक्षेप)

कोरोना लस ओमिक्रॉनवर परिणामकारक?

कोरोना विरोधी लस ओमिक्रॉनवर पुरेशा परिणामकारक ठरणार नाहीत, अशी चर्चा असल्याने त्याचाही परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या की त्यानुसार देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी-जास्त होत असतात.

किंमती कमी होण्याचे कारण काय?

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या की त्यानुसार देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आलेख वर खाली होत असतो. त्यामुळे आताही तेल उत्पादक कंपन्या इंधनाच्या किंमती स्थिर ठेवणार की बदलवणार..याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ओमिक्रॉनमुळे घसरलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे पेट्रोल, डिझेलच्या देशांतर्गत किमतीही कमी होतील, अशी अपेक्षा आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here