संकल्प संस्था, मुंबई स्माईल आणि सप्रेम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी नगर गोवंडी येथे सामाजिक कार्यकर्त्यांकरिता मानवी तस्करी या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना आणि संकल्प संस्थेच्या कामाबद्दल माहिती दिली.
यथोचित मार्गदर्शन
मुंबई स्माईल आणि सप्रेम संस्थेची कार्यप्रणाली तसेच मानवी तस्करी म्हणजे काय? कोणत्या देशातून राज्यातून मानवी तस्करी होते? त्याची कारणे काय? अशी घटना कळल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका काय असावी? या विषयावर रोल प्ले आणि चर्चासत्राच्या माध्यमातून कालिदास रोटे यांनी खूप छान मार्गदर्शन केले.
( हेही वाचा : जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त जेजे रुग्णालयाचा स्तुत्य उपक्रम! )
वर्षा कांबळे यांनी आतापर्यंत मुलींची सुटका कशाप्रकारे केली, त्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? सोडवणूक करतांना काय काय खबरदारी घ्यावी लागते? याबद्दल काही उदाहरणे त्यांनी मांडली. अॅड. माया सोनावडे यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या कामात काही अडचणी येऊ नयेत म्हणून कायद्याची माहिती का गरजेची आहे, तसेच संविधानामध्ये मानवी तस्करी संदर्भात कोणकोणते कायदे आहेत, कोणत्या कायद्यामध्ये आतापर्यंत काय दुरुस्ती झाली आहे आणि एकाद्या सोडवणूक कामात कोणत्या प्रकारची कार्यप्रणाली कशा पध्दतीने कार्य करते या बद्दल तपशीलवार माहिती दिली. सविता हेंडेवे यांनी सर्व मान्यवरांचं यथोचित स्वागत केले. कालिदास रोटे आणि विजय मोरे यांनी आपल्या मधुर सुरांनी जागृती गीते सादर केली. या कार्यशाळेत विशेष सहकार्य जयश्री (माई) सावर्डेकर, नसरीन शेख, अरुणा सावंत, साजीद खान, गायत्री चव्हाण यांचे लाभले. आभारप्रदर्शन रजनी बेळणेकर यांनी केले.
Join Our WhatsApp Community