पर्यावरणशील शहर निर्मितीकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपणाप्रमाणेच वृक्ष संवर्धनाकडेही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष दिले जात असून मागील 2 वर्षात दोन लाखांहून अधिक वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली आहे. यामध्ये सेक्टर 14 कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानामध्ये मियावाकी पध्दतीने शहरी जंगल निर्मितीप्रमाणेच सेक्टर 28 नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथेही मियावाकी पध्दतीने 1 लक्ष 23 हजार देशी प्रजातीच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आलेली असून हा देशातील सर्वात मोठा मियावाकी पध्दतीचा शहरी जंगल प्रकल्प आहे.
( हेही वाचा : Budget Trip : पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर आणि हटके जागा!)
बांबूच्या वृक्षरोपांची लागवड करण्याचे नियोजन
या मियावाकी प्रकल्पाच्या परिसरात 5 जून रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 1 हजार बुध्दा बेली बांबूच्या वृक्षरोपांची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बुध्दा बेली बांबूला हरित पानांचा फुलोरा येतो. हा बांबू हवेत अधिक प्रमाणात ऑक्सिजन सोडत असल्याने हवा शुध्दीकरण करणारा म्हणून नावाजला जातो. तसेच पक्षी घरटे बांधण्यासाठीही या झाडाला प्राधान्य देतात. याव्दारे पामबीच मार्गावरून मोठ्या प्रमाणात ये-जा करणा-या वाहनांमुळे होणा-या आवाजाला प्रतिबंध होऊन ध्वनीप्रदूषण कमी होईल, त्याचप्रमाणे हरित कुंपणभिंत होईल.
वृक्षारोपण उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
तरी या वृक्षारोपण उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक असणा-या पर्यावरणप्रेमी नागरिकांनी 5 जून रोजी जागतिक पर्यावरणदिनी सकाळी 7 ते 10 या वेळेत ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील मियावाकी वृक्षारोपण केलेल्या परिसरात वृक्षारोपण उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community