वायू प्रदुषणाचा धोका वाढला… डब्ल्यूएचओच्या अहवालात मोठा खुलासा

दरवर्षी वायू प्रदूषणामुळे जगात 7 दशलक्ष लोकांचा अकाली मृत्यू होण्याचा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे.

प्रदूषणाचे दुष्परिणाम हे सध्या संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. त्यामुळे या वाढत्या संकटावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात वायू प्रदूषणामुळे जगात मृत्यूचे प्रमाण किती वाढले आणि त्यामुळे येणा-या पिढीचे किती मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, याचा अहवाल प्रसिद्ध केला.

डब्ल्यूएचओने नवीन ग्लोबल एअर क्वालिटी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मानवी आरोग्यावर
वायू प्रदूषणाच्या नुकसानीचे स्पष्ट पुरावे देणारा हा अहवाल आहे. मार्गदर्शक तत्त्वे नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तसेच हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी दिली गेली आहेत. दिलेल्या मार्गदर्शक अहवालांचे त्वरित पालन करण्यास सुरुवात केली तर लाखो लोकांचे प्राण वाचू शकतात, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

वायू प्रदुषणामुळे होतात इतके मृत्यू

दरवर्षी वायू प्रदूषणामुळे जगात 7 दशलक्ष लोकांचा अकाली मृत्यू होण्याचा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे. लहान मुलांमध्ये फुफ्फुसांची वाढ होणे आणि त्यांचे कार्य कमी होणे, श्वसन संक्रमण आणि दम्याचा त्रास वाढणे इत्यादी आजार होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. प्रौढांमध्ये हृदयरोग आणि स्ट्रोक ही अकाली मृत्यूची सर्वात सामान्य कारणे आहेत जी वायू प्रदुषणामुळे वाढली आहेत.

(हेही वाचाः यासाठीच ‘मी सर्व मंत्र्यांचे लाल दिवे काढून घेतले!’ गडकरींनी सांगितले कारण)

 

या वायूंमुळे होते सर्वाधिक प्रदूषण

वातावरणातील बदलांसह वायू प्रदूषण हा मानवी आरोग्यासाठी सर्वात मोठा पर्यावरणीय धोका आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारणे फार गरजेचे आहे. विषारी वायूंचे उत्सर्जन कमी केल्यास हवेची गुणवत्ता सुधारू शकते. या मार्गदर्शक तत्वांची पातळी गाठण्याचा प्रत्येक देशाने प्रयत्न केला, तर तो प्रत्येक देश आपल्या नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण आणि जागतिक हवामानात होणारा बदल दोन्ही गोष्टी कमी करू शकतो. पार्टिक्युलेट मॅटर (PM), ओझोन (O₃), नायट्रोजन डायऑक्साइड (NO₂) सल्फर डायऑक्साइड (SO₂) आणि कार्बन मोनोऑक्साइड (CO), या सहा हानिकारक प्रदुषकांमुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते.

(हेही वाचाः अंबरनाथ येथे ‘या’ वायुची गळती, ३० जण गुदमरले!)

डब्ल्यूएचओचे आवाहन

जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. या वायू प्रदुषणाचा सर्वाधिक फटका कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील लोकांना बसतो, असे डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅधनोम म्हणाले. मी सर्व देशांना आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या सर्वांना विनंती करतो की दिलेल्या सूचनांचे पालन करुन, पृथ्वीला वायू प्रदूषणमुक्त करण्यावर प्रत्येक देशाने भर द्यायला हवा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here