वडापाव… आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलेला हा पदार्थ जगात भारी आहे. वडापाव हा आपल्यापैकी प्रत्येकाचाच वीक पॉईंट आहे. आता डाएट म्हणून अनेकदा डॉक्टर किंवा जीम ट्रेनर वडापाव बंद करण्याचा सल्ला देतात. पण वडापाव हे व्यसन आहे. त्यामुळे एखाद्याला वडापाव सोडायला सांगणं म्हणजे दारुड्याला दारू सोडायला सांगण्यासारखं आहे.
आता वर्षाचे 365 दिवस जगात कुठले ना कुठले तरी डे चालूच असतात. मग आपल्या चविष्ट वडापावचा दिवस का असू नये? म्हणूनच 23 ऑगस्ट रोजी जागतिक वडापाव दिवस साजरा केला जातो. पोट भरणारा वडापाव अनेकांसाठी आजही उत्पन्नाचे साधन आहे. या वडापावने एकेकाळी गिरणी कामगारांच्या पोटाची खळगी देखील भरली होती.
(हेही वाचाः बेरोजगारांना केंद्र सरकार देतंय 6 हजार रुपये? सरकारने सांगितले योजनेतील सत्य)
अशी झाली सुरुवात
आपल्या महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत गल्लोगल्लीत एकतरी फेमस वडापाववाला असतोच. तसा पहिला वडापाव तळला गेला तो दादर स्टेशन बाहेर असणा-या अशोक वैद्य यांच्या गाडीवर. तसेच दादरमध्येच सुधाकर म्हात्रे यांनीही वडापाव सुरू केला. आता बटाट्याची भाजी आणि पोळी या टिपिकल मराठमोळ्या जेवणाला पर्याय म्हणून वडापाव जन्माला आला आणि प्रत्येकाच्या जीभेवर चवीने रेंगाळला.
या वडापावची खासियत म्हणजे गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळेच याच्या प्रेमात आहेत. जो खवय्या आहे तो वडापावच्या गाडीवर आलाच म्हणून समजा. आता काळानुसार वडापावचे दर वाढले असले तरी जेव्हा वडापावचा जन्म झाला तेव्हा तो केवळ 10 पैशांना मिळत होता.
असा झाला लोकप्रिय
मुंबई आणि कापडाच्या गिरण्या यांचं एक अतूट नातं एकेकाळी होतं. यातूनच वडापावचा आणि मुंबईकरांच्या नव्या नात्याचा धागा विणला गेला. मुंबईतल्या गिरणगांव म्हणजेच दादर, लालबाग, परेल आणि गिरगांव परिसरातील गिरणी कामगारांमुळे वडापावला लोकप्रियता मिळाली. गिरण्या बंद झाल्यानंतर जीभेचे चोचले पुरवणारा हा वडापाव गिरणी कामगारांचे पोट भरू लागला. अनेक गिरणी कामगारांच्या मुलांनी गिरण्या बंद झाल्यानंतर वडापावच्या व्यवसायातून आपली रोजीरोटी चालू ठेवली. आजही हा वडापाव खाणाऱ्यांसोबतच खाऊ घालणाऱ्यांच्या पोटाचा आधार आहे.
‘शिववडा’चा इतिहास
जेव्हा मुंबईत वडापावचा जन्म झाला त्याच दरम्यान मराठी माणसासाठी झटणा-या बाळासाहेबांच्या शिवसेनेचाही उदय झाला. मुंबईत दाक्षिणात्यांची अरेरावी वाढल्यामुळे शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात आंदोलन छेडले. तेव्हा उडप्यांचा इडली, डोसा खाण्यापेक्षा अस्सल मराठमोळा वडापाव खा… असे आवाहन त्यावेळी शिवसैनिकांनी मुंबईकरांना केले. त्यासाठी मराठी तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शिवसेनेने ‘शिववडा’ची सुरुवात केली.
Join Our WhatsApp Community