आरोग्याच्या अनेक समस्या या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या असतात. शरीरात एखाद्या गोष्टीची कमतरता निर्माण झाल्यास किंवा एखादी समस्या निर्माण झाल्यास त्याचा केवळ एकाच अवयवावर परिणाम होत नाही किंवा एकच आजार होत नाही, तर अनेकदा एका समस्येमुळे इतरही अनेक समस्या निर्माण होतात. यासाठी कायम आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. आरोग्याची काळजी घेत असताना आहार आणि व्यायामाला महत्व देणं आणि त्याकडे लक्ष देणं जसं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे झोप देखील अत्यंत महत्वाची आहे. पुरेशी आणि शांत झोप घेण्यासोबत योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने झोपणं हे देखील आरोग्यासाठी तितकचं महत्वाचं आहे.
एका अभ्यासानुसार झोपेच्या चुकीच्या पॅटर्नमुळे Sleeping Pattern आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होवू शकतात. खास करून चुकीच्या झोपेच्या सवयींमुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. परिणामी पोटशी संबंधीत इतर समस्याही निर्माण होवू शकतात. झोपेची अयोग्य वेळ आणि अयोग्य पोझिशन म्हणजे पद्धत यामुळे शरीरावर अनेक परिणाम होवू शकतात. पचनाच्या समस्यांसोबतच झोपेच्या चुकीच्या पोझिशनमुळे मानेचा, पाठीचे त्रास निर्माण होवू शकतात. शिवाय जर दर ९० मिनिटांनी तुमची झोपमोड होत असेल तर त्याचा मायक्रोबायमवर परिणाम होतो. शिवाय मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं.
झोपेची योग्य वेळ कोणती असावी
एखादी व्यक्ती रात्रभर झोपूनही जर संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारी देखील झोपत असेल तरी ते आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. निरोगी राहण्यासाठी रात्रीची ७-८ तासांची झोप घ्यावी. आजारी व्यक्ती किंवा लहान मुलं, गरोदर महिला दुपारची झोप घेऊ शकतात. याशिवाय रात्री जेवणानंतर किमान २ ते ३ तासांनी झोपावं. यामुळे पचनाचे त्रास दूर होतील. रात्री उशीरा जेऊन तुम्ही उशीरा झोपत असाल तर तुम्हाला पोटाच्या समस्या निर्माण होतील. यासाठी रात्रीचं जेवण उशीरा न करता योग्य वेळेत जेऊन रात्री ९.३० ते १०.३० या वेळेत झोपल्यास तुम्हाला पहाटे उठणं सहज शक्य होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. जर तुम्ही उशीरा उठत असाल तर तुम्हाला दिवसभर सुस्ती जाणवू शकते.
झोपण्याची योग्य पद्धत
- झोपण्याच्या पद्धीतीचा किंवा पोझिशनचादेखील आरोग्यावर परिणाम होत असतो. चुकीच्या पोझिशनमुळे मान, पाठ तसचं कंबरदुखी एवढचं नव्हे तर डोकेदुखीचा त्रास होवू शकतो.
- झोपण्यासाठी जर तुम्ही उशी वापरत असाल तर ती जास्त उंच नसावी अन्यथा तुम्हाला मानेच्या समस्या निर्माण होवू शकतात आणि डोकेदुखीचा त्रास होवू शकतो.
- जेवणानंतर जास्त वेळाचं अंतर न ठेवता तुम्ही झोपत असाल तर झोपताना काही वेळ डाव्या कुशीत झोपावं. यामुळे पचनासंबंधी त्रास होत नाही.
- प्रत्येकाच्या झोपण्याच्या विविध सवयी असतात. कुणी पाठीवर झोपत कुणी कुशीत झोपतं तर कुणी पोटावर. पाठीवर, कुस करून किंवा पोटावर झोपण्याच्या पद्धीतीचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.
- यासाठी रात्री शक्यतो रात्रभर एकाच स्थितीत झोपू नये. काहीवेळ पाठीवर झोपल्यानंतर थोडा वेळ कुसकरून झोपावं. तसंच रात्रभर एकाच बाजुला वळून झोपू नये अधून मधून कुस बदलावी.
- अशा प्रकारे जर तुम्ही योग्य वेळेत झोपून वेळेत उठलात आणि योग्य पोझिशनमध्ये झोपलात तर तुम्हाला आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत.