- विशेष प्रतिनिधी,मुंबई
येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी १८ नोव्हेंबरला थांबला. मागील काही दिवसांपासून प्रचाराच्या ज्या तोफा कडाडत होत्या, त्या तोफा सोमवारी थंडावल्या. हा प्रचारजोर थांबल्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसापर्यंत प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी आपली रणनिती आखत असतो. या रणनितीचा एक भाग म्हणजे चूहा मिटींग.
असे म्हटले जाते की, याच चूहा मिटींगद्वारे तब्बल २० ते २५ टक्के निकाल फिरवण्याची ताकद असते आणि त्यामुळे या चूहा मिटींगला मोठे महत्व असते.
विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विविध राष्ट्रीय, प्रादेषिक तसेच अपक्ष अशाप्रकारे एकूण ४२० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून उमेदवारी जाहीर झाल्यापासून तथा उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केल्यानंतर हा प्रचार सोमवारी १८ नोव्हेंबरला थांबला गेला. त्यामुळे आजवर केलेल्या प्रचारानंतर मतदारांचा कौल कुठे असेल हे येत्या २० नोव्हेंबरला इव्हीएम मशिनद्वारे स्पष्ट होईल. मात्र, प्रचार संपल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसापर्यंतच्या दोन रात्री या अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात आणि प्रत्येक उमेदवार या दोन्ही रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या गुप्त भेटी घेत असतो आणि त्यांना मतदान आपल्याला करण्याचे आवाहन करतो. ही बैठक गुप्त असल्याने तसेच रात्रीच्यावेळी होत असल्याने याला चूहा मिटींग असे संबोधले जाते.
उमेदवाराच्या प्रतिनिधींकडून महत्वाच्या सोसायटी, बैठका, प्रतिष्ठीत व्यक्त, ज्याच्या शब्दाला मान आणि जी व्यक्ती आपल्या सांगण्यावर मते फिरवू शकतो, अशा सर्व व्यक्ती तसेच मंडळांचे प्रतिनिधी आदींची रात्रीच्या वेळी भेट घेऊन पैशांचे किंवा विकासकामांचे आश्वासन देतो आणि त्यावर आपल्याकडे मतदान फिरवून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे निवडणूक प्रचारामध्ये चूहा मिटींगचे महत्व मोठे असून विरोधात जाणारा निकाल फिरवण्याची ताकद या चूहा मिटींगमध्ये असल्याचे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून जाते. (Maharashtra Assembly Election 2024)
अनेक सोसायटी, तसेच इमारतींचे मतदान हे केवळ त्यांच्या भागातील विकासकामांवर फिरले जाते. यामध्ये इमारतीच्या छतावर पत्रे बसवणे, सोसायटी परिसरात लाद्या लावून देणे, सोलर प्लॅन देणे, पाण्याची टाकी बसवून देणे, रेनवॉटर हार्वेस्टींगची कामे आदींची प्रत्यक्ष कामे किंवा यासाठीचा निधी दिला जातो. तसेच अनेक मंडळांना ठराविक रक्कम दिली जाते. यासर्वांच्या जोरावर सोसायटी, इमारतीचा तसेच झोपडपट्टी परिसरातील मतदान शेवटच्या क्षणाला या चूहा मिटींगनंतर कुठे दिले जावे, याचा निर्णय घेतला जातो आणि त्यानुसार मतदान होते असे बोलले जाते. (Maharashtra Assembly Election 2024)
(हेही वाचा – माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्या गाडीवर दगडफेक)
चूहा मिटींगमध्ये मुंबईत शिवसेना पक्ष अग्रेसर होता. प्रचार संपल्यानंतर लोकांच्या गुप्त गाठीभेटी घेऊन त्यांचे मतदान आपल्याकडे वळवण्याचा हा प्रयत्न यशस्वी होत असल्याने नंतर भाजपा (BJP) आणि इतर पक्षांच्या उमेदवारांकडूनही होवू लागला. परंतु आता प्रचार संपल्यानंतर या चूहा मिटींगची वाट न पाहता आता प्रचारादरम्यानही अशा प्रकारच्या गुप्त बैठका आणि गाठीभेटी दिवसा आणि रात्री उशिरापर्यंत उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी करत असतात. राजकीय पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पूर्वी प्रचार संपल्यानंतर चूहा मिटींग व्हायच्या. परंतु आता प्रचारादरम्यान म्हणजे दुपारचा प्रचार संपला की, संध्याकाळचा प्रचार सुरु होण्यापूर्वी तसेच रात्री प्रचार संपला की रात्री उशिरापर्यंत उमेदवाराला प्रचारात जिथे जिथे उणीव किंवा आपल्याला मतदान कमी होईल याचा अंदाज येतो, त्या भागातील सोसायटी, मंडळे आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या बैठका घेतल्या जातात. आता या चूहा मिटींग प्रचारादरम्यानही होत असल्याने पूर्वी शेवटच्या दोन दिवसांमध्ये होणाऱ्या चूहा मिटींग या फक्त महत्वाच्या ठिकाणांचे मतदान फिरवण्यासाठीच होते असे त्यांचे म्हणणे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community