मतदानयंत्राद्वारे मतदानात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत तसेच मतपत्रिकेच्या माध्यमातूनच निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने आंदोलन छेडले आहे भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच आव्हान दिले आहे. नवनीत राणा म्हणाल्या की, महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदान यंत्रांवर आक्षेप घेतला नाही. मात्र आता ते उगाच आरोप करीत सुटले आहेत. त्यांना जर इव्हीएमवर शंका असेल, तर अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी आधी राजीनामा द्यावा. त्यासोबतच बडनेराचे आमदार रवी राणा हे देखील राजीनामा देतील. मग, ही निवडणूक मतपत्रिकेच्या माध्यमातून घ्यावी. मला तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची कमाल वाटते. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले, त्यावेळी त्यांनी इव्हीएमवर शंका उपस्थित केली नाही. त्या वेळी इव्हीएम बरोबर होते तेव्हा लोकशाही जिवंत होती, असा टोला नवनीत राणा (Navneet Rana) यांनी लगावला.
(हेही वाचा – शरद पवारांनी जातीने भेट दिलेल्या Markadwadi ग्रामस्थांचा मतदानाचा कल काय; आकडेवारी समोर)
नवनीत राणा म्हणाल्या, आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यावर आक्षेप घेण्यासाठी आम्ही कुणीही बाहेर आलो नाही. आता जर त्यांना इव्हीएमवर शंका असेल, तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा, बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा देखील राजीनामा देतील, त्या वेळी मतपत्रिकेवर मतदान एकदा होऊन जाऊ द्या, असे आव्हान नवनीत राणा यांनी विरोधकांना दिले.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षाकडून मतदान यंत्राविषयी संशय व्यक्त केला जात असून या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्यावर भाष्य करताना नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वकाही बरोबर होते. त्यावेळी लोकशाही जिवंत होती आणि आता विरोधात निकाल आला, म्हणून लोकशाही धोक्यात आली, हा विरोधकांचा दुटप्पीपणा आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community