माहीम (Mahim) विधानसभा मतदारसंघात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली गेल्याने मनसे आणि महायुती यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत दबाव आणला गेला. सदा सरवणकर (Sada Saravankar) यांनी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने या मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे.
(हेही वाचा – Unwanted Calls चा मारा, सामान्यांना ताण सारा !)
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याने महायुतीमधून त्यांच्याविरोधात उमेदवार नको, अशी अपेक्षा भाजपच्या काही नेत्यांनी व्यक्त केली होती. यामध्ये प्रसाद लाड, नितेश राणे, आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा समावेश होता. राज ठाकरे यांनी लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्या मुलाविरोधात उमेदवार नको, अशी भाजप नेत्यांची भूमिका होती. आता मात्र भाजप नेत्यांच्या भूमिकेत अचानक बदल झाल्याचे दिसून येत आहे.
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आमचा पाठिंबा हा सदा सरवणकर यांनाच असेल, असे स्पष्ट केले. त्या पाठोपाठ राज ठाकरे यांच्याशी उत्तम वैयक्तिक संबंध असलेल्या आशिष शेलार यांनीही म्हटले की, महायुतीच्या दृष्टीने माहीमचा विषय संपला आहे. महायुतीचे उमेदवार आता सरवणकरच आहेत आणि महायुतीचा उमेदवार तोच आमचा उमेदवार, अशी भूमिका आशिष शेलार यांनी घेतली. मात्र, महायुतीमधील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी माहीमबाबत चर्चा करुन वेगळा निर्णय घेतला, तर गोष्ट वेगळी, असेही शेलार यांनी म्हटले.
भाजपच्या नेत्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सदा सरवणकर (Sada Saravankar) यांच्या पाठीशी उभे रहाण्याची भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्षात निवडणुकीत भाजपची मते कुठे जाणार, हे पाहावे लागेल. राज ठाकरे यांचे भाजपच्या अनेक नेत्यांशी उत्तम वैयक्तिक संबंध आहेत. त्यामुळे माहीम विधानसभा निवडणुकीत मनसेला पडद्यामागून गुप्तपणे रसद पुरवली जाणार का, अशी चर्चा होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community