स्वतःचा पक्ष काढणारे Sharad Pawar दुसऱ्यांना गद्दार म्हणत आहेत; संभाजीराजे छत्रपती यांचा टोला

36
स्वतःचा पक्ष काढणारे Sharad Pawar दुसऱ्यांना गद्दार म्हणत आहेत; संभाजीराजे छत्रपती यांचा टोला
स्वतःचा पक्ष काढणारे Sharad Pawar दुसऱ्यांना गद्दार म्हणत आहेत; संभाजीराजे छत्रपती यांचा टोला

शरद पवारांनी (Sharad Pawar) काँग्रेस नेतृत्त्वाला नाकारून स्वतःचा पक्ष उभा केला, पण आता दुसऱ्यांनी त्यांचा मार्ग निवडल्यास त्यांना गद्दार म्हणत आहेत, असे आरोप महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी केला.

नाशिकमध्ये प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी पक्षाचे अधिकृत उमेदवार करण गायकर यांच्या प्रचार सभेत संभाजीराजेंनी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला. यावेळी सिन्नर उमेदवार शरद शिंदे, इगतपुरीचे उमेदवार शरद तळपडे, कळवणचे उमेदवार रमेश थोरात यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाशिककरांचा या सभेला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.

(हेही वाचा – MNS Manifesto : विधानसभेसाठी मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध! जाहीरनाम्यात वेगळं काय?)

आपल्या भाषणात संभाजीराजे छत्रपती यांनी गद्दार, प्रस्थापित, आणि स्वार्थी नेत्यांना चांगलंच फटकारलं. त्यांनी मराठा आरक्षण, सहकाराचा ऱ्हास, विकासाची लक्तरं, आणि अन्यायाविरोधात उघडपणे भूमिका मांडली. कोल्हापूरनंतर सर्वाधिक प्रेम त्यांनी नाशिककरांनी माझ्यावर केलं, असेही ते म्हणाले.

अनेक नेते खुर्ची टिकवण्यासाठी विचारधारा सोडत आहेत, असे सांगत त्यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) थेट हल्ला चढवला, “सोनिया गांधींच्या नेतृत्त्वाला मानायला नकार देत त्यांनी स्वतःचा रस्ता निवडला, स्वतःचा पक्ष काढताना पवार साहेबांना काही वाटलं नाही. पण आता तेच दुसऱ्यांना गद्दार म्हणत आहेत!. ज्यांना स्वतःचा पक्ष काढायचा ते काढतात, पण इतरांनी तसं केलं की त्यांना गद्दार म्हणायचं हे कुठलं राजकारण?”

सभेत शिवाजी महाराजांचा आदर्श घेत त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी कटिबद्ध असल्याचं ठासून सांगितलं. “मी मूठभर मावळ्यांना घेऊन हा लढा सुरू केला आहे, संख्या नाही पाहणार, अन्यायाविरोधात उभं राहणार!” अशी त्यांची गर्जना होती. आज त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊनच पक्ष स्थापन केला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

विकासाच्या मुद्यावर बोलताना संभाजीराजे म्हणाले की, “एकेकाळी सहकाराची पंढरी म्हणून महाराष्ट्र ओळखला जात होता. पण आज सहकार बुडीत गेलाय! याच बोक्यांनी कारखाने बुडवले आणि हे राजकीय टग्यांनी ते विकत घेत स्वतःचा स्वार्थ साधला. कांदा, द्राक्ष, प्रक्रिया उद्योग यावर कोणत्याच नेत्याला बोलायचं नाही, यावरही त्यांनी चांगलीच चपराक दिली.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचं कौतुक असलं, तरी मराठी शाळाच अस्तित्वात नाहीत, मग मराठी शिकवणार कुठं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणासाठी स्वराज्य पक्षाची भूमिका ठाम आहे. त्यामुळे महायुती की महाविकास आघाडी असा विचार न करता महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना निवडुन आणा, असे आवाहन ही त्यांनी केले.

राजकीय तडजोडींचा समाचार घेत संभाजीराजे म्हणाले की, “कालपर्यंत जे भाजपला शिव्या घालत होते, तेच आता त्यांच्या गळ्यात गळे घालतायत.” महाराष्ट्राच्या हितासाठी उभं राहणं आवश्यक आहे, असं म्हणत त्यांनी प्रस्थापित राजकारण्यांवर जोरदार हल्ला चढवला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.