Srinivas Vanaga ३६ तासांनंतर परतले; पण…

112
Srinivas Vanaga ३६ तासांनंतर परतले; पण...
Srinivas Vanaga ३६ तासांनंतर परतले; पण...

पालघर विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाने विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा (Srinivas Vanaga) यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ते ३६ तास संपर्कात नव्हते. कुटुंबीयांना फोन करून सुखरूप असल्याचे सांगितल्यानंतर ते घरी परतले. परंतु काही मिनिटांतच पुन्हा घराबाहेर पडले. उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांच्या मनात निर्माण झालेल्या तीव्र अस्वस्थतेमुळे हे सर्व घडले आहे. त्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत राजकीय संघर्ष उघड झाला आहे.

(हेही वाचा – Divorce News: सहमतीने घटस्फोट घेणाऱ्यांसाठी हायकोर्टाने कौटुंबिक न्यायालयांना दिल्या महत्त्वाच्या सूचना)

शिंदे गटाने वनगांच्या जागी राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्याने वनगा अतिशय दुखावले होते. सुरत बंडावेळी एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिल्यानंतर उमेदवारीची अपेक्षा वनगांना होती. मात्र ती न मिळाल्याने त्यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली होती. वनगांनी उद्धव ठाकरेंना ‘देवमाणूस’ म्हणत शिंदे गटाला ‘घातकी’ म्हणून टीका केली. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे त्यांची नाराजी केवळ वैयक्तिक नसून गटातील कार्यकर्त्यांमध्येही असंतोष पसरवणारी आहे.

वनगा बेपत्ता असताना त्यांच्या पत्नीने वनगांच्या मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबीय अत्यंत चिंतेत होते. शेवटी मंगळवारी रात्री वनगा घरी आले आणि कुटुंबीयांशी बोलल्यानंतर पुन्हा बाहेर गेले.

यामध्ये शिंदे गटाच्या उमेदवारी निर्णयामुळे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यांच्या पत्नीने सांगितले की ते मित्रांसोबत आहेत, मात्र पुढील हालचालीबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

शिंदे गटाच्या या निर्णयाने पक्षाच्या अंतर्गत असंतोषाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटात काही कार्यकर्ते आणि नेत्यांनी वनगा यांना उमेदवारी न देण्यावर नाराजी व्यक्त केली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री शंभुराज देसाई यांनी हस्तक्षेप करून त्यांच्या पत्नीला विधानपरिषद पदाचे आश्वासन दिले आहे. हे आश्वासन पक्षाच्या अंतर्गत तणाव कमी करण्यासाठी केलेली खेळी आहे असे मानले जात आहे.

दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यामुळे वनगा या निवडणुकीत लढणार नाहीत हे निश्चित झाले आहे. परंतु निवडणुकीत ते (Srinivas Vanaga) कोणाला पाठींबा देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.