उपनगरातील सांताक्रूझमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला जेवणात दररोज ‘आर्सेनिक’ आणि ‘थेलीयम’ हे विषारी द्रव्य थोडेथोडे मिसळून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी, २ डिसेंबर रोजी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पतीची संपत्ती हडप करण्यासाठी तसेच प्रियकरासोबत कायमचे राहण्यासाठी पत्नीने प्रियकरासोबत हा कट रचल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. ऑगस्ट महिन्यात निधन झालेल्या सासूच्या जेवणात देखील तिने विष कालवल्याचा संशय पोलिसांना असून सासूच्या मृत्यूबाबत देखील पोलीस पुरावे शोधत आहेत.
संसाराच्या १२ वर्षांनंतर पती-पत्नीत वाद
कविता उर्फ काजल शहा आणि हितेश जैन असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. कविता हिचा विवाह सांताक्रूझ पश्चिम येथील दत्तात्रय रोड, गुरुकृपा सोसायटीत राहणारे कमलकांत शहा याच्यासोबत वर्ष २००० मध्ये झाला होता. आरोपी हितेश जैन हा कमलकांत याचा बालपणाचा मित्र आहे. कमलकांत आई सरलादेवी पत्नी कविता उर्फ काजल व दोन बहिणीसह गरुकृपा सोसायटीत राहण्यास होता. कमलकांत याचा मुंबई, ठाणे आणि भिवंडी येथे लूमचा व्यवसाय आहे. वडिलांच्या निधनानंतर कमलकांतवर सर्व जबाबदारी आली होती, दोन्ही बहिणीचे लग्न केल्यानंतर कमलकांत हा आई सरलादेवी पत्नी कविता उर्फ काजल आणि दोन मुलांसह राहत होता. कमलकांतचा बालमित्र हितेश जैन हा वरच्यावर कमलकांतच्या घरी येत-जात होता. कुटुंबात सर्वकाही आलबेल सुरु असताना कविता उर्फ काजल आणि कमलकांत याच्या संसाराला कुणाची नजर लागली आणि पती-पत्नी यांच्यात क्षुल्लक वादातून भांडणे होऊ लागली होती. कमलकांत हा नेहमी समजुतीने घेऊन वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत होता, त्याउलट पत्नी कविता उर्फ काजल ही त्याच्याशी जास्त भांडण करीत होती, हे भांडण एवढे टोकाला गेले की, कविताने पतीकडे सोडचिठ्ठी मागितली व संपत्तीचा अर्धा हिस्सा मागितला. अखेर कमलकांतच्या नातेवाईक आणि बहिणीने मध्यस्थी करून दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
(हेही वाचा आता धुळ्यात Love Jihad; शरीराचे 70 तुकडे करण्याची धमकी)
घरच्या स्वयंपाक घराचा ताबा घेतला
माहेरी निघून गेलेली कविता उर्फ काजल ६ महिन्यांपूर्वी घरी राहण्यास आली परंतु तिने त्याच खोलीत वेगळे राहण्याचा निर्णय घेतला, ती मुलीचा आणि स्वतःचा स्वयंपाक वेगळा करू लागली. काही दिवसांनी कविताने स्वयंपाक घराचा ताबा घेऊन घरातील घरगडीला इतर कामे करण्यास सांगू लागली आणि सासू आणि पती याचे जेवण स्वतः बनवू लागली होती. २९ जुलै रोजी कमलकांत याची आई सरलादेवी हिच्या पोटात अचानक दुखू लागले, तिच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले, परंतु तिचा आजर दिवसेंदिवस वाढत चालला होता, कमलकांतने कोकिलाबेन रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु केले असता तिच्या आतड्यांना सूज आल्याचे निदान झाले, त्यानंतर देखील तिची प्रकृती खालावत गेली आणि हळूहळू तिचे सर्व अवयव निकामी होऊन १३ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. सर्व अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे निदान प्राथमिक निदान डॉक्टरांनी दिले होते. सरला देवीच्या मृत्यूबाबत कोणालाही संशय आला नाही. त्याच महिन्यात २४ ऑगस्ट रोजी कमलकात हा भिवंडी येथील कार्यालयात असताना त्याच्या पोटात मोठ्या प्रमाणात दुखू लागले, त्याच्यावर दादर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले, मात्र कमलकांतचा आजार वाढतच चालला होता, आईच्या निधनानंतर भावाकडे आलेल्या बहिणी आणि भावोजींनी कमलकांतला मुंबईच्या बॉम्बे रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले, तेथील डॉक्टरांनी कमलकांतवर उपचार सुरु केले, परंतु कमलकांतच्या आजाराचे निदानच होत नव्हते, अखेरीस डॉक्टरांनी काही रक्ताच्या चाचण्या करण्यासाठी सांगितल्या असता या चाचण्यांचे अहवालात कमलकांतच्या रक्तात ‘आर्सेनिक’ हा धातू सामान्य प्रमाणापेक्षा जास्त आढळून आला व दुसऱ्या रक्ताच्या अहवालात थेलीयम हा धातू देखील सामान्य प्रमणापेक्षा अधिक प्रमाणात आढळून आला.
(हेही वाचा चार न्यायमूर्तींच्या खंडपीठाने अवैध ठरवलेल्या ‘वक्फ’ला नेहरूंनी दिली नवसंजीवनी )
पतीच्या मृत्यूनंतर आला संशय
आर्सेनिक आणि थेलीयम हे एक प्रकारचे विष असून हे विष कोणीतरी खाण्यापिण्यातून दिल्याशिवाय शरीरात जाणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी कमलकांत याला ऍंटीडोस दिले मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही, हळूहळू कमलकांतचे सर्व अवयव निकामी होऊ लागले व कमलकांत बेशुद्ध झाला. डॉक्टरांनी देखील नातेवाईकांना कमलकांतच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. १९ सप्टेंबर रोजी रात्री कमलकांतचे उपचारादरम्यान निधन झाले. आझाद मैदान पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती, त्यानंतर हे प्रकरण पुढील तपासासाठी सांताक्रूझ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले होते. आईच्या पाठोपाठ भावाच्या मृत्यूमुळे दोन्ही बहिणीवंर संकट कोसळले होते, परंतु भावाच्या पत्नीच्या चेहऱ्यावर त्याचा लवलेशही दिसून येत नव्हता, त्यात भाऊ रुग्णालयात असताना भावाच्या पत्नीचे वागणे संशयास्पद हालचाली आणि डॉक्टरांनी विषाबद्दल सांगताना तिचा भयभीत झालेला चेहरा यावरून कमलकांतची मोठी बहीण कविता हीचा संशय येऊ लागल्यामुळे तिने याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. अखेर हे प्रकरण गुन्हे शाखा कक्ष ९ कडे तपासासाठी पाठविण्यात आले. कक्ष ९ च्या अधिकऱ्यानी वैद्यकीय अहवाल, डॉक्टरांची चर्चा व कमलकांतच्या नातेवाईकाचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. यादरम्यान सर्व पुरावे कमलकांची पत्नी कविता उर्फ काजल आणि हितेश जैन याच्या विरोधात जात होते.
पोलीस तपासात सत्य बाहेर
गुन्हे शाखेने हितेश जैन याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी सुरु केली, तर दुसरीकडे महिला अधिकारी यांनी कविता उर्फ काजल हिच्याकडे चौकशी सुरू केली. दोघांच्या जबाबात अनेक तथ्य आढळून आल्यानंतर तपास यंत्रणानी दोघांची समोरासमोर चौकशी केल्यानंतर दोघांच्या कबुलीत हत्येचा गुन्हा उघडकीस आला. हितेश जैन आणि कविता उर्फ काजल यांना एकत्र राहायचे होते व कमलकांतची संपत्ती देखील हडप करायची होती, यासाठी दोघांनी काही महिन्यापूर्वीच कट रचला होता, अशी माहिती समोर आली. गुन्हे शाखेने गुरुवारी या दोघांविरुद्ध हत्या, विष देणे, कट रचणे याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. या दोघांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कमलकांत याची आई सरलादेवी हिचा मृत्यू देखील या विषाने झाला असावा, असा संशय पोलिसांना असून या दोघांनी सरलादेवीची याप्रकारे हत्या केल्याचा संशय पोलिसांना असून या अनुषंगाने तपास सुरु आहे.
Join Our WhatsApp Community