आफताब पूनावाला या मुस्लिम तरुणाने श्रद्धा वालकर या तरुणीची निर्घृण हत्या केली. श्रद्धाच्या हत्येमुळे संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात येत असतानाच, आता या प्रकरणाने एक नवे वळण घेतले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार श्रद्धाची हत्या ही 18 मे रोजी करण्यात आली. पण तिच्या मित्राने दिलेल्या जबाबानुसार, त्याचा श्रद्धासोबत जुलै महिन्यात संपर्क झाला होता. त्यामुळे श्रद्धाची हत्या नेमकी कधी झाली याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
श्रद्धासोबत जुलैमध्ये संपर्क
श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडार याने केलेल्या दाव्यानुसार, जुलै 2022 मध्ये श्रद्धाने त्याच्याशी व्हॉट्सअपद्वारे संपर्क केला होता. त्यावेळी ती प्रचंड घाबरलेली होती, तसेच तणावाखाली दिसत होती. माझा जीव वाचवा, नाहीतर तो मला मारुन टाकेल, असा मेसेज श्रद्धाने नाडारला केला होता. तसेच याबाबत आपण तिच्या घरच्यांनाही सांगितले असल्याचे नाडारने पोलिसांना सांगितले.
तसेच श्रद्धाची मैत्रीण शिवानी म्हात्रे हिने देखील श्रद्धाशी जुलैमध्ये संपर्क झाला असून, ऑगस्टपासून तिच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे श्रद्धाची हत्या मे की जुलै महिन्यात झाली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोपीने केला मोबाईलचा वापर
दरम्यान, श्रद्धा जिवंत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी आफताबने तिचे सोशल मीडिया अकाऊंट्स वापरले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अजूनही श्रद्धाचा मोबाईल सापडलेला नाही. त्यामुळे नक्कीच आरोपी आफताबने तो मोबाईल वापरुन नाडारशी संपर्क साधला असावा, असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community