आता राष्ट्रवादीतील एकनाथ शिंदेंकडे लक्ष

175

अनेक वर्षांची भाजपा-शिवसेनेची युती उद्धव ठाकरे यांनी तोडली. याआधी सुद्धा या दोन्ही पक्षात खटके उडाले होते. परंतु बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली इतका मोठा यू-टर्न शिवसेनेने घेतला नव्हता. राजकारणामध्ये सध्याचे यश न पाहता भविष्यातील यश पाहावे लागते. आज मिळालेल्या क्षणिक यशामुळे जर भविष्यात मोठा पराभव पत्करावा लागणार असेल तर त्या क्षणिक यशाला तिलांजली वाहावी लागते. शिवसेना-भाजपा युती केवळ मंत्रीपदासाठी तोडण्याची खरोखर काहीच गरज नव्हती.

केंद्रातील भाजपाचे वरिष्ठ नेते दुखावले गेले नसते

महाराष्ट्राच्या जनतेचा कौल पाहता बहुसंख्य जनता भाजपासोबत उभी आहे, हे पाहून उद्धव ठाकरेंना भाजपासोबतच राहण्यातच शहाणपण होते, तसेही देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे दुखावले जाणार नाहीत याची काळजी घेत होते. परंतु उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होण्याची खूप घाई झाली होती. राजकीय सभ्यता म्हणून किमान त्यांनी निवडणुकीपूर्वी युती तोडली असती आणि सगळे स्वतंत्रपणे लढले असते व त्यानंतर ते आघाडीत शिरले असते, तर आज जी शिवसेनेची परिस्थिती आहे, तशी झाली नसती. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील भाजपाचे वरिष्ठ नेते दुखावले गेले नसते. अर्थात आता जर-तरच्या गोष्टींना अर्थ नाही.

(हेही वाचा मोठी बातमी: ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाला मिळणार ‘ऑस्कर 2023’?

ठाकरेंचा सर्वात मोठा अपमान ठरला

उद्धव ठाकरेंनी आवश्यकता नसताना भाजपाला फसवले व त्याची किंमत म्हणून त्यांच्याच लोकांनी त्यांची साथ सोडली. एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी आपण प्रतिशोध घेतल्याचे कबुलही केले. आणि यात कही वाईटही नाही. युतीचे सरकार असताना ठाकरे भाजपावर सतत टीका करत होते. आघाडीचे सरकार असताना भाजपाच्या नेत्यावर हल्ले झाले. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली. ठाकरेंना आपल्याच लोकांशी शिंदे गटाशी म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेशी लढावे लागत आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करुन उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे अधिक कार्यक्षम आणि योग्य आहेत, असा संदेश भाजपाने ठाकरेंना दिला आणि हाच ठाकरेंचा सर्वात मोठा अपमान ठरला. मुख्यमंत्रीपद गेले यामुळे ठाकरे जितके रागावले नसतील त्यापेक्षा शिंदेंना मुख्यमंत्री केले म्हणून रागावले असतील. आता हे दोन गट भांडत बसतील.

राष्ट्रवादीत फूट पडणार

आता महाराष्ट्रात बहुमताने सरकार स्थापन करायचे असेल, तर राष्ट्रवादीतले एकनाथ शिंदे कोण असतील याकडे भाजपाचे लक्ष लागले असण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीची सूत्रे जोपर्यंत शरद पवारांच्या हातात आहे तोपर्यंत भाजपला पूर्ण बहुमत मिळणे अवघड आहे. कारण शरद पवार महाराष्ट्रात भाजप विरोधी लोकांना एकत्र आणण्यात यशस्वी झाले आहेत. महाविकास आघाडी हा त्यातलाच एक यशस्वी प्रयोग आहे. अजित पवारांवर अन्याय होतोय किंवा त्यांना डावललं जातंय किंवा अजितदादा राष्ट्रवादीत खुश नाहीत हे उघड गुपित आहे. भाजपासाठी ठाकरे हा विषय संपला असून त्यांचं पूर्ण लक्ष आता राष्ट्रवादीकडे लागलं आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आणि भाजपापासून वेगळं करण्यात शरद पवारांचा मोलाचा वाटा आहे. जनतेने बहुमत दिलं असताना देखील भाजपाला आपला मुख्यमंत्री बसवता आला नाही. याला उत्तर म्हणून भविष्यात राष्ट्रवादीतही मोठा उठाव होऊ शकतो. राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नाही हे तर लोकांना कळलं आहे. परंतु शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला उघडपणे आव्हान कोण देईल? खरोखर राष्ट्रवादीतून एक एकनाथ शिंदे पुढे येईल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.